औरंगाबाद : सोशल मीडियामुळे माणसा-माणसातील सहनशीलता किती कमी आणि संवेदनशीलता किती बोथट झालीय, याचं उदाहरणं औरंगाबादमध्ये समोर आलंय. व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपवर चॅटिंगदरम्यान केवळ विरोधात मेसेज केला म्हणून तलवार, चाकू, रॉड आणि लाठ्या-काठ्यांनी हल्ला करुन 35 वर्षीय व्यक्तीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.


नेमकं काय झालं?

व्हॉट्सअॅपवर चॅटिंग दरम्यान मोईन मेहमूद पठाण यांनी विरोधात मेसेज टाकला. याचा राग मनात धरुन 15 ते 20 जणांनी पठाण यांच्यावर हल्ला केला. तलवार, चाकू, रॉड आणि लाठ्या-काठ्यांनी पठाण यांच्यावर हल्ला चढवत, भर चौकात त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. औरंगाबादमील हर्सुलमध्ये फातेमानगर येथे रात्रीच्या वेळी ही घटना घडली.

35 वर्षीय मोईन मेहमूद पठाण हे व्यावसायाने प्लॉटिंग एजंट होते.

यावेळी मोईन मेहमूद पठाण यांच्यासोबत त्यांचा भाचाही होता. भाच्याला सुद्धा मारहाण करण्यात आली असून, तो गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, रात्री उशिरा हर्सुल पोलीस ठाण्यात 15 ते 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही.