Pune News : नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या (Nagarparishad Election) पार्श्वभूमीवर एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील बारामती आणि उरुळी फुरसुंगी देवाची या दोन्ही ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. नगराध्यक्ष व सर्व सदस्यांच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. तसेच तळेगाव दाभाडे, लोणावळा, सासवड आणि दौंड मधीलही काही प्रभागातील जागांच्या निवडणुकाला स्थगिती देण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया 4 डिसेंबरपासून पुन्हा सुरु केली जाणार आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 20 डिसेंबरला मतदान तर 21 डिसेंबरला होणार मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून परिपत्रक जाहीर करून दिली माहिती दिली आहे. नगराध्यक्ष तसेच इतर सर्व सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित दिली आहे. बारामती पाठोपाठ फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेची निवडणूक ही पुढे ढकलली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठीची सर्व निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली.
रत्नागिरी नगरपरिषदेतील प्रभाग 10 ची निवडणूक स्थगित
रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याप्रकरणात अपिलाचे निकाल उशिराने लागल्याने रत्नागिरी नगर पालिकेतील प्रभाग 10 ची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली आहे. ही निवडणूक आता 2 डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सुधारीत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
रत्नागिरी नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग दहामध्ये अपक्ष उमेदवार सचिन शिंदे व संपदा रसाळ-राणा यांचा उमेदवारी अर्ज हा प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या रचनेनुसार नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला होता. त्याविरोधात दोन्ही उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केली होती. हे अपिल जिल्हा न्यायालयात 24 नोव्हेंबर रोजी फेटाळण्यात आले होते. त्यामुळं 23 नोव्हेंबर किंवा त्यानंतर आलेल्या निकालांमुळे या सदस्यपदांच्या निवडणुका 4 नोव्हेंबरच्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेऊ नयेत व ही निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रभाग 10 व्यतिरिक्त अन्य प्रभागांची निवडणूक यापूर्वी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार घेण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रभाग 10 साठी त्यामुळं नवीन कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची तारीख 10 डिसेंबर दु.3 वाजेपर्यत आहे. आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह देऊन, अंतिम लढवणाऱ्या निवडणूक उमेदवारांची यादी 11 डिसेंबर रोजी प्रसिध्द करायची असून 20 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30पर्यत मतदान होणार आहे तर मतमोजणी 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. करायची आहे. 4 डिसेंबरपासून प्रभागापुरती आचारसंहिता लागू होणार आहे.