Election : एकीकडे राज्यात  रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असताना प्रत्यक्षात मात्र निवडणुका लांबणीवर पडण्याचीच चिन्हं आहेत. नुकत्याच झालेल्या शिंदे-फडणविस सरकारच्या कॅबिनेट बैठकीत ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय रद्द करत नव्या सरकारनं पुन्हा एकदा प्रभाग रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यात सरकार दोन मंत्र्यांचं...त्यातही एक मुख्यमंत्री तर दुसरे उपमुख्यमंत्री. खातेवाटप नाही, मंत्रीमंडळ नाही. जी स्थिती राज्यात तीच महापालिका, नगरपरिषदांमध्येही...महापालिकेत महापौर नाही,नगरसेवक नाहीत. अनेक महापालिकांची मुदत उलटूनही अनेक महिने उलटलेत. पण सगळा कारभार  प्रशासकाच्या हाती. त्यामुळे, शहरातल्या नागरी समस्या सोडवण्या करता तातडीनं निवडणूका हव्यातच...पण पुन्हा एकदा महापालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणूका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.  

2017च्या प्रभाग रचनेनुसार चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  घेण्यात आला.  यामुळे प्रभाग रचना, प्रभागांचे आरक्षण, सोडत काढणे, ही प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार आह़े. तसेच 2017 च्या प्रभागांच्या संख्येनुसारच महापालिकांची निवडणूक घेण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षी तीन सदस्यीय प्रभाग रचना लागू केली होती. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने महापालिकांमध्ये पुन्हा चार प्रभाग पद्धत लागू केली. जिल्हा परिषदांमध्ये किमान 50, तर कमाल 75 सदस्य संख्या ठेवण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.   मुंबई महापालिका अधिनियमात सुधारणा करून सदस्य संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला भाजपसह काँग्रेसेनेही विरोध केला होता. 

आता मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्यसंख्येत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महापालिकेत वॉर्ड रचना कशी असणार ?

  • मुंबई महापालिकेत सध्याच्या 236 सदस्यांऐवजी पूर्वीप्रमाणे 227 सदस्य संख्या होईल. 
  • इतर महानगरपालिकांमध्येही त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्येत सुधारणा होणार आहे. 
  • जिल्हा परिषदेत कमी कमी 50 आणि जास्तीतजास्त 75 सदस्य असतील. 
  •  राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याला किमान 50 जागा देण्यात येतील.  

गेल्या अडिच वर्षात राज्यात तीन नवी सरकारं आली...आणि प्रत्येक वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांबाबतचे निर्णय बदलत गेले.

गेल्या अडीच वर्षांत कोणकोणते बदल झाले? 

डिसेंबर 2019  : बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्दमार्च 2020 : एक सदस्यीय प्रभाग पद्धत लागू, नगराध्यक्षांची नगरसेवकांमधून निवडसप्टेंबर-ऑक्टोबर 2021 : महाविकास आघाडी सरकारने पुन्हा निर्णय बदलला. बहुसदस्यीय प्रभाग पद्धत, तीन सदस्यीय प्रभाग पद्धतजुलै 2022 : नगराध्यक्ष आणि सरपंचांची थेट निवडणूक3 ऑगस्ट : महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये 2017 च्या पद्धतीनुसारच प्रभागांची रचना ओबीसी आरक्षणाची कोंडी फुटल्यानंतर या आरक्षणानुसार निवडणूक पात्र सर्व महापालिकांच्या निवडणुका लवकर घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिले होते. त्यानंतरही या निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी सरकारने न्यायालयात केलेली मागणी न्यायालयाने फेटाळली होती. एवढेच नव्हे तर आपल्या निर्णयाची अंमलबजाणी करण्यात टाळाटाळ केल्यास राज्य निवडणूक आयोगावार अवमानाची कारवाई करण्याचा इशाराही न्यायालायने दिला होता. मात्र,  राज्य सरकारने पुन्हा कायद्यात सुधारणा करीत सदस्य संख्या बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व प्रक्रिया नव्याने करावी लागणार असल्याने निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जातेय