Mumbai Train Megablock:मुंबईतील उपनगरीय प्रवाशांसाठी महत्वाची बातमी. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उद्या रविवारी (दि.23) मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे ठाणे कल्याण स्थानकांसह सांताक्रूझ गोरेगाव स्थानकांवर अनेक लोकल गाड्या रद्द किंवा वळवण्यात आल्या आहेत. या ब्लॉकचा मुंबईसह लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होणार असून मुंबईकरांना वेळापत्रक पाहूनच घरातून बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आलाय. रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तपासणी अशा तांत्रिक दुरुस्त्यांसाठी हा ब्लॉक राहणार आहे. (Mumbai Train Megablock)

Continues below advertisement


मध्य रेल्वे वेळापत्रक


मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 या वेळेत असेल. ब्लॉक दरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन जलद आणि अर्ध जलद लोकल गाड्या ठाणे ते कल्याणदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत, त्यामुळे त्या कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. याचप्रमाणे, कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद आणि अर्ध जलद लोकल गाड्या कल्याण ते ठाणे दरम्यान धीम्या मार्गावर धावतील आणि नंतर मुलुंड स्थानकापासून पुन्हा जलद मार्गावर येतील.


ट्रान्सहार्बर मार्गावर सर्व लोकल रद्द


ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10ते दुपारी 4.10 या वेळेत ब्लॉक असणार आहे. या कालावधीत पनवेल, वाशी आणि नेरूळ येथून ठाण्याकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सर्व लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, ठाणेहून पनवेल, वाशी आणि नेरूळला जाणाऱ्या लोकल गाड्याही बंद राहतील.


पश्चिम मार्गावर रेल्वे कुठे थांबणार?


पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 या वेळेत घेतला जाणार आहे. या कालावधीत या मार्गावरील सर्व जलद लोकल गाड्या धीम्या मार्गावरून धावतील. त्याशिवाय, काही अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. याचदरम्यान बोरिवली आणि अंधेरी स्थानकांदरम्यान धावणाऱ्या काही लोकल गाड्या गोरेगावपर्यंतच चालवल्या जातील.


 



हेही वाचा:


Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आजपासून 12 ते 3 दरम्यान ब्लॉक, तीन दिवस वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गांचा करा वापर