मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये पावसाच्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे प्रशासनाला अधिकार देण्यात आले आहे. राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने 10वी व 12वीच्या उद्या होणारी पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 10वी चे पुढे ढकलण्यात आलेले पेपर 2 ऑगस्ट रोजी होतील तर 12 वीचे पेपर 11 ऑगस्ट रोजी होतील. 


मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे लोकल सेवा आणि वाहतूक सेवावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघरमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर कोकणात येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 


गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आज मुंबई, ठाणे, कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे आज या ठिकाणच्या शाळा बंद ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तर इतर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवायच्या का नाहीत ते त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून ठरवण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 


परिस्थिती पाहून निर्णय घ्या, शिक्षण उपसंचालकांचे आदेश


राज्यातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश मुंबई शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. 


पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकक्षेतील परिस्थिती विचारात घेता आपत्तीच्या पूर्वसूचनेवरून, हवामान खात्याच्या अंदाजावरून तसेच त्या त्या भागातील पावसाच्या सद्यस्थितीचा तसेच त्या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्या स्थानिक क्षेत्रातील शाळांना सक्षम प्राधिकरण यांच्या मान्यतेने सुट्टी जाहीर करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत.


दरम्यान, राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.


पालघरमध्ये एनडीआरएफची टीम तैनात 


पालघर जिल्ह्यासाठी मंगळवारपासून दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या त्या अंदाजानुसार रात्रीपासूनच पावसानं पालघर जिल्ह्यात जोर पकडला. त्यामुळं प्रशासनाकडून पालघर जिल्ह्यातल्या नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. त्याचवेळी पालघर जिल्ह्यासाठी एनडीआरएफ जवानांची एक तुकडी खबरदारीची उपाययोजना म्हणून विरारमध्ये तैनात करण्यात आली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नायगाव, ससूनवघर आणि घोडबंदर भागात पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झाली. केळवे रोड स्थानर परिसरात पुराचं पाणी साचून रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.