Mumbai Pune Highway News : मुंबई-पुणे महामार्गावरील (Mumbai Pune Expressway) प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाल्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावरी गेल्या 24 तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. अशातच पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. वाहतूक कोंडी कायम असल्यानं एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई सेंट्रल, दादर, ठाणे, बोरीवली कडे जाणाऱ्या सर्व एस टी बसेसच्या फेऱ्या रद्द
पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर आडोशी बोगज्याजवळ प्रोपोलिन गॅस टँकर उलटल्याने मोठी गळती सुरु होती. यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अद्यापही मोठी वाहतूक कोंडी असल्याचे असटी प्रशासनाने बसच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, दादर, ठाणे, बोरीवली कडे जाणाऱ्या सर्व एस टी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील काही तासासाठी बसेस फेऱ्या बंद राहणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.
राज्यातील विविध विभागांमधील एकूण 139 बस फेऱ्या रद्द
पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं राज्यातील विविध विभागांमधील एकूण 139 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये 73 ई-शिवनेरी व 66 इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे. तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण 163 वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील 46, सोलापूर विभागातील 36, पुणे विभागातील 20, सांगली विभागातील 18, कोल्हापूर विभागातील 13, पालघर विभागातील 12, ठाणे विभागातील 11 आणि मुंबई विभागातील 7 वाहनांचा समावेश आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने कळविले आहे.
प्रवाशांचे मोठे हाल
मुंबई–पुणे महामार्गावरील भीषण वाहतूक कोंडीचा फटका आता दुसऱ्या दिवशीही कायम आहे. काल संध्याकाळपासून सुरू झालेला हा ट्रॅफिक जाम अद्याप पूर्णपणे सुरळीत झालेला नाही, आणि यामुळे हजारो प्रवासी अडचणीत सापडले आहेत. या कोंडीचा थेट परिणाम आता राज्य परिवहन सेवेलाही बसला आहे. मुंबई–पुणे दरम्यान धावणारी महाराष्ट्र शासनाची प्रीमियम बस सेवा ‘शिवनेरी’ सध्या बंद ठेवण्यात आली आहे. महामार्गावरील परिस्थिती लक्षात घेऊन ही सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्याहून मुंबईकडे जाणारे अनेक नागरिक बस स्थानकांवर तासन्तास अडकून पडले आहेत. काही ठिकाणी प्रवाशांना तीन ते चार तासांहून अधिक प्रतीक्षा करावी लागत असल्याची माहिती समोर येते आहे. कामानिमित्त, शैक्षणिक कारणांसाठी आणि वैद्यकीय गरजांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अचानक बस सेवा बंद झाल्यामुळे पर्यायी प्रवासाची सोय शोधताना प्रवाशांची धावपळ सुरू आहे. महामार्गावरील वाहतूक कधी पूर्णपणे सुरळीत होणार आणि शिवनेरी सेवा कधी पुन्हा सुरू होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या: