Mumbai Municipal Corporation Election : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार आणि महापौर देखील काँग्रेसचाच बनवणार असा संकल्प काँग्रेस नेत्यांनी केला आहे. पनवेल येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन दिवशीय कार्यकर्ता शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. 


या शिबीरात काँग्रेस नेत्यांचे मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर विशेष लक्ष होते. काँग्रेस नेते भाई जगताप , बाळासाहेब थोरात यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ऐकला चलो रेचा नारा दिला आहे. काँग्रेस पक्ष स्वबळावर मुंबईत लढून आपलाच महापौर बनवणार असल्याचे भाई जगताप आणि बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. सरकार मधील 
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असला तरी आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी स्वबळाचा नारा नेत्यांनी दिलाय. याबरोबरच काँग्रेसचे अध्यक्षपद राहूल गांधी यांनी घ्यावे असा ठराव यावेळी पारीत करण्यात आला.


दोन दिवसीय  शिबीरात अनेक विषयांवर चर्चा झाली. यात प्रामुख्याने महापालिका निवडणुकीसंदर्भात  मार्गदर्शन करण्यात आले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी  मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे.  काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील याकडे नेत्यांचे लक्ष असणार आहे. यासाठी रणननीती ठरवण्यात  येत आहे. महाविकास आघाडीमध्ये  कॉग्रेसचा देखील मोलाचा वाटा असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांनी  मार्गदर्शन करताना सांगितले.


यावेळी शिक्षणमंत्री वर्षा  गायकवाड यांनी ठराव मांडले. यात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद राहुल  गांधी यांनी घ्यावे हा ठराव मांडण्यात आला. संघटनेमध्ये सर्वांना सन्मान मिळाला पाहिजे, काँग्रेसचे प्रवक्ते  तयार करावेत, यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, यासह पक्षात महिलांना सक्षम करण्यासाठी विशेष उपक्रम  राबविण्यात येत असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली.


"यंदा मुंबई महापालिका निवडणूक  स्वतंत्र  लडवणार असून, महापौर देखील कॉंग्रेसचाच असेल असा विश्वास मुबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी व्यक्त केला. याबरोबरच मुंबई प्रभाग  आरक्षणाबाबत न्यायालयात जाणार असल्याचा इशारा भाई जगताप यांनी दिला आहे.