संचमान्यतेची कठोर अट, मुंबईतील 57 मराठी शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर, विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी
मुंबईत मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या सातत्याने कमी होत असताना आता संचमान्यतेच्या कठोर अटींमुळे सुमारे 57 मराठी शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
Mumbai Marathi school : मुंबईत मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या सातत्याने कमी होत असताना आता संचमान्यतेच्या कठोर अटींमुळे सुमारे 57 मराठी शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आल्याची माहिती पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित शाळांची संचमान्यता तात्पुरती स्थगित ठेवून त्यांना विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांनी केली आहे.
केवळ 337 शाळा मराठी माध्यमाच्या आहेत
मुंबईत सर्व माध्यमे व विविध मंडळांच्या मिळून एकूण 1736 शाळा कार्यरत आहेत. त्यापैकी केवळ 337 शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. तर सुमारे 945 शाळा अल्पसंख्यांक संस्थांच्या अंतर्गत चालवल्या जातात. यातील निम्म्याहून अधिक शाळा अनुदानित स्वरूपातील आहेत. एकूण अल्पसंख्यांक शाळांपैकी 505 शाळांची भाषिक अल्पसंख्यांक म्हणून नोंद आहे. धार्मिक अल्पसंख्यांक शाळांमध्ये उर्दू माध्यमाच्या 170 तर ख्रिश्चन संस्थांच्या 199 शाळांचा समावेश आहे. या आकडेवारीवरुन मुंबईत मराठी शाळांचीच संख्या तुलनेने कमी होत असून मराठी शाळाच अल्पसंख्यांक ठरत असल्याची स्थिती निर्माण झाल्याचा दावा शिक्षक परिषदेने केला आहे.
उर्दू आणि ख्रिश्चन माध्यमाच्या काही शाळांना आवश्यकता नसतानाही अल्पसंख्यांक दर्जा दिला जातोय का?
उर्दू आणि ख्रिश्चन माध्यमाच्या काही शाळांना आवश्यकता नसतानाही अल्पसंख्यांक दर्जा देण्यात येत आहे का, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी परिषदेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि मंत्री आशिष शेलार यांच्याकडे करण्यात आली आहे. मराठी शाळा टिकल्या नाहीत तर मराठी भाषा, संस्कृती आणि प्रादेशिक ओळख यावर दूरगामी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मराठी शाळांना भौतिक सुविधा, आर्थिक मदत आणि संचमान्यतेसंदर्भात आवश्यक ते संरक्षण द्यावे, अशीही भूमिका शिक्षक परिषदेने मांडली आहे.
बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या 57 पैकी 34 शाळा पश्चिम मुंबई जिल्ह्यातील असून 19 शाळा उत्तर मुंबईतील
बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या 57 पैकी 34 शाळा पश्चिम मुंबई जिल्ह्यातील असून 19 शाळा उत्तर मुंबईतील आहेत. तर चार शाळा दक्षिण मुंबईत आहेत. या शाळा बंद पडण्यामागे कमी विद्यार्थीसंख्या हे प्रमुख कारण आहेच, पण त्यात राज्य सरकारच्या संचमान्यतेचा निर्णयही कारणीभूत आहे. पूर्वीच्या पद्धतीनुसार शाळेतील एकूण पटसंख्येच्या आधारे प्रत्येक 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षकपद सरकारकडून मंजूर केले जात होते, मात्र शिक्षण विभागाने लागू केलेल्या नव्या नियमावली आणि सॉफ्टवेअर प्रणालीमुळे आता शिक्षकपदांची मान्यता शाळेच्या एकूण पटसंख्येऐवजी प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार दिली जाणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI























