Parshuram Ghat: मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतूकीसाठी आज पासून बंद असणार आहे. 25 एप्रिल पासून 25 मे पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या वेळेत सहा तास घाट बंद असणार आहे.  चौपदरीकरणाच्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ नये व कामाला गती मिळावी आणि पावसाळ्यापूर्वी धोकादायक क्षेत्रातील काम पूर्ण व्हावे यासाठी घाट बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.  


या सहा तासांत पर्यायी वाहतूक लाईट वेट चिरणी - आंबडस ते कळबस्ते - चिपळूण मार्गे वळवण्यात आली आहे. पर्यायी मार्गावरून वाहतूकीसाठी अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


या कामाला गती देऊन पावसाळ्यापूर्वी रुंदीकरण पूर्ण करणे, तसेच आवश्यक तिथे संरक्षण भिंती उभारण्यासाठी ही वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. साधारणपणे एक महिना हे काम चालेल. कामाला सुरुवात करण्यापूर्वी घाटासह चिपळूण ते आंबा घाट आणि खेड ते पनवेल याबाबतची माहिती फलक लावून द्यावी असे जिल्हाधिकारी डॉ.बी एन पाटील यांनी सांगितले होते.  घाटात काही वळणावर अपघात होण्याचा धोका आहे, तीथे गतिरोधक आवश्यक आहे, त्याची उभारणी करा, अशा सूचना डॉ.पाटील यांनी दिल्या होत्या.


परशुराम घाटातील वाहतूक वाहतूक महामार्ग चौपदरीकरण कामासाठी पर्यायी मार्गाने वळविण्याच्या आदेशानुसार ही वाहतूक आंबडस - चिरणी - लोटे रस्ता व कळस - आंबड - धामणंद रस्ता मार्ग पर्यायी मार्गाने वळवणे व सर्व प्रकारची अवजड वाहतूक मुंबई - पुणे मार्ग व पुणे-कराड मार्गे वळवण्यात बाबत जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विनंती करण्यात आली आहे. वाहतूक बंदी बाबत माहिती फलक तयार करून राष्ट्रीय महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी लावणे, तसेच लगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वाहतूक बंदी बाबतची पूरक प्रसिद्धी देण्याबाबतची कार्यवाही कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी व कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग पेन जिल्हा रायगड यांनी एकमेकांशी समन्वय साधून करावयाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.


परशुराम घाट चौपदरीकरण कामावेळी घाटाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या दुर्गवाडी मधील 15 घरे व घाटाच्या खालच्या बाजूला मौजे पेढे गावातील कुंभारवाडी मधील 20 घरे, बौद्धवाडी मधील 7 घरे, घरभेवाडीतील 17 घरे, कोष्टेवाडीतील 12 घरे अशा एकूण 71 घरांना चौपदरीकरण कामावेळी व पश्चात कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यावी पर्यायी वाहतूक मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून पोलिस अधीक्षक रत्नागिरी व उपप्रादेशिक वाहन अधिकारी रत्नागिरी यांनी योग्य ते नियोजन करून आवश्यक ते पोलीस चौकी, अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करावी, अशा सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.