Mumbai-Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर तारा गावाजवळ कारमध्ये आढळलेल्या संजय करले यांच्या हत्येच्या तपासाला वेग आला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आढळलेल्या या मृतदेहाच्या तपासासाठी पोलीसांची चार पथके तयार करण्यात आली आहेत. महामार्गावरील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न ही पथकाकडून करण्यात येत आहे. 


शुक्रवारी रात्रीच्या सुमारास तारा गावाजवळ महामार्गाच्या कडेला एक अज्ञात गाडी उभी असल्याचे आढळून आले. गेल्या दोन दिवसांपासून लाल रंगाची आलिशान ऑडी - क्यू ३ ही गाडी बेवारस असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती पोलीसांना दिली असता त्यांनी या गाडीची पाहणी केली. त्यामध्ये एक व्यक्ती निपचित असल्याचे दिसून आले. यावेळी, पोलीसांनी ही गाडी उघडून शहानिशा केली असता तो व्यक्ती मृत असल्याचे आढळून आले. त्याच्या शरीरावर चार गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे समोर आले. तर, मृत व्यक्ती हा पुणे तळेगाव येथील संजय करले असल्याची ओळख पटल्याने पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविली.


दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पनवेल येथील पोलीस उपअधिक्षक यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर, संजय याचा मृतदेह हा मुंबईतील जेजे रुग्णालयात फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. तर, मृत संजय करले ह्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून गेल्या काही महिन्यांपूर्वी जामिनावर सुटला असल्याचे समोर आले आहे. तर, संजय करले ह्याच्यावर डुप्लिकेट सोन्याची नाणी विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, संजय हा इस्टेट एजंट आणि गाडी विकण्याचा व्यवसाय करीत असून त्याच्यावर मोक्का देखील लावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
 
दरम्यान, संजय करले याच्या खुनाच्या तपासासाठी पोलीसांचे चार पथक तयार करण्यात आले असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये, मुंबई गोवा हायवेवरील हॉटेल, रिसॉर्ट आणि मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावरील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत. त्यातच, आज  सकाळच्या सुमारास घटनास्थळावर रस्स्त्यालगतच्या झुडपात पुरावे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर, संजय करले याचा मृतदेह सापडलेली ऑडी कार ही त्याने तेजस साळवे यांच्याकडून खरेदी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, संजय करले याची हत्या नेमकी का ? आणि कुणी केली याचा तपास करण्याचे आवाहन पोलीसांसमोर आहे. 


आणखी वाचा : पॅरोलवर सुटलेल्या संजय कार्लेचा कारमध्ये आढळला मृतदेह, गोळ्या झाडून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती