सिंधुदुर्ग: तब्बल 12 वर्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे आज एकाच मंचावर येत आहेत.
सिंधुदुर्गात आज मुंबई-गोवा महामार्गाचं भूमीपूजन होणार आहे. त्यासाठी केंद्रीय रस्तेविकासमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांचीही उपस्थिती असेल.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेस आणि शिवसेनेकडून जोरदार पोस्टरबाजी सुरु आहे. मात्र राणेंच्या पोस्टरवर काँग्रेसचा उल्लेख नाही. त्यामुळं पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
राणेंच्या पोस्टरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे फोटो झळकत आहेत.
दरम्यान, कुडाळच्या बस डेपो मैदानावर हा कार्यक्रम होतोय. त्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यासाठी 400 पेक्षा अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरे आणि नारायण राणे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर!
राजशिष्टाचारानुसार जिल्ह्यातील स्थानिक आमदार म्हणून नितेश राणे आणि विधानपरिषद आमदार नारायण राणे यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. त्यामुळे नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे.
नारायण राणे शिवसेना सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत व्यासपीठावर येण्याची ही पहिलीच वेळ असेल.