Mumbai Crime News : केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) CGST (सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स), सांताक्रूझ विभाग, मुंबई येथील सुपरिंटेंडंट आणि इन्स्पेक्टरला 25000 रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. सीबीआयने हा गुन्हा 7 ऑक्टोबर 2025 रोजी नोंदवला होता. तक्रारीनुसार, संबंधित CGST अधिकाऱ्याने एका खासगी वस्त्र व्यवसाय करणाऱ्या फर्मला जीएसटी नोंदणी मिळवून देण्यासाठी आणि अनुकूल अहवाल तयार करून देण्यासाठी 25000 रुपयांची लाच मागितली होती. या फर्मने 24 सप्टेंबर 2025 रोजी ऑनलाईन जीएसटी नोंदणीसाठी अर्ज केला होता.

Continues below advertisement


तक्रारीनुसार, 3 ऑक्टोबर 2025 रोजी तपासणी दरम्यान, संबंधित इन्स्पेक्टरने स्वतःसाठी आणि आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी लाचेची मागणी केली, आणि धमकी दिली की जर पैसे दिले नाहीत तर GST नोंदणी प्रमाणपत्र जारी केले जाणार नाही. सीबीआयने सापळा रचून 7 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील CGST पश्चिम कार्यालयात दोघा आरोपींना 25000 लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर, दोघा आरोपी अधिकाऱ्यांच्या ठिकाणी झडतीही घेण्यात आली. दोन्ही अटकेतील आरोपींना आज मुंबईतील सक्षम न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


गेल्या आठवड्यातच ठाण्यात 25 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक


गेल्या आठवड्यातच (2 ऑक्टोबर ) मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Mumbai ACB) मोठी कारवाई केली होती. ठाणे महापालिका (Thane Municipal Corporation) मुख्यालयात संध्याकाळी उशिरा धाड टाकल्याने खळबळ उडाली होती. ठाणे महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असतानाच ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे (Shankar Patole) यांच्या कार्यालयात ही धाड टाकण्यात आली. ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना 25 लाखांची लाच (Bribe) घेतल्याप्रकरणी त्यांना रात्री (2 ऑक्टोबर ) उशिरा अटक करण्यात आली. तसेच पाटोळे यांच्यासोबत आणखीन एक जणाला ताब्यात (Mumbai ACB) घेण्यात आले आहे. ठाणे महापालिकेचा भ्रष्ट अधिकाऱ्याला अटक केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते महेश मोरे यांनी एसीबीच्या अधिकाऱ्यांवर फुले उधळली आणि या कारवाईचे स्वागत केले. तसेच ठाणे महापालिकेतील इतर अधिकाऱ्यांवर अशीच कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही मोरे यांनी केली आहे. आधीच ठाणे शहारातील बेकायदा बांधकामे चर्चेत असून पालिकेच्या आजी-माजी अधिकाऱ्यांची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. त्यातच घोडबंदर रोड या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम ठिकाणी असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी तब्बल 25 लाखांची मागणी उपायुक्त शंकर पाटोळे यांनी बिल्डरकडे केली. 


महत्वाच्या बातम्या:


Thane ACB Action: ठाण्यातील उपायुक्ताना 25 लाखांची लाच घेणं भोवलं, शंकर पाटोळेंसह एकाला बेड्या; सामाजिक कार्यकर्त्यांकडून फुले उधळत एसीबीच्या कारवाईचे स्वागत