Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह सचिन वाझे, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे चारही आरोपींना पाच दिवासांची कोठडी वाढवून दिली आहे. त्यामुळे 16 एप्रिलपर्यंत सीबीआयच्या ताब्यात असणार आहेत. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने निर्णय दिला. देशमुखांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सीबीआय करत आहे. 


अनिल देशमुख तपासात सहकार्य करत नाहीत. ते विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासह इतरांचीही कस्टडी वाढवून हवी असा युक्तीवाद सीबीआयने कोर्टात केला आहे. यावर देशमुख यांचे जेष्ठ वकील विक्रम चौधरीं यांनी युक्तिवाद  केला. चौकशी दरम्यान शांत राहण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. उत्तरं देत नाहीत म्हणून रिमांड वाढवून द्या, ही मागणी अयोग्य असे सांगण्यात आले. त्यांचं वय वाढलेलं आहे, त्यांना विविध आजार आहेत. त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. या गोष्टींचा विचार करायला हवा, असा युक्तवाद विक्रम चौधरी यांनी केला. तसेच सीबीआयच्या कार्यपद्धतीवर सवालही उपस्थित करण्यात आला. 


संजीव पालांडे यांना टॉयलेट बाहेर तासंतास बसवून ठेवल जातं. कोर्टानं सीबाआय कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेज तपासावं. असा युक्तीवाद संजीव पालांडेंचे वकील शेखऱ जगताप यांनी केला. देशमुखांचे खासगी सचिव या नात्यानं कुंदन शिंदेंविरोधात कोणताही थेट आरोप नाही. शिंदे यांनी तपासांत पूर्ण सहकार्य केलंय. तरीही सीबीआयचं समाधान होत नाही.  अनिल देशमुख, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या तीन आरोपींच्यावतीनं कस्टडी वाढवून देण्याला विरोध केलाय. मात्र सचिन वाझे यांच्या वकिलांनी आरोपींची कस्टडी वाढवून देण्याचं समर्थन केलं. 


हे सारं प्रकरण माझ्या समोर घडलंय. मी एक पोलीस अधिकारी राहीलोय, त्यामुळे कस्टडी किती महत्त्वाची असते याची आपल्याला कल्पना आहे. मला जे काही सांगायचं होतं ते मी आधीच सांगितलंय. सचिन वाझेंच्या वतीनं अॅड. रौनक नाईक यांनी युक्तिवाद केला. 


हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि यात मोठ मोठी लोकं सहभागी आहेत. त्यामुळे एक दोन रिमांडमध्ये या तपासाची चौकशी पूर्ण होण्यातली नाही. आरोपी दुस-या प्रकरणांत न्यायालयीन कोठडीतच आहेत. जरी कोर्टानं त्यांना तिथे परत पाठवलं तरी तिथं जाऊन त्यांची चौकशी सुरूच राहील. मात्र ती तितक्या प्रभावीपणे करता येणार नाही. त्यामुळे सध्यातरी त्यांची कस्टडी वाढवून द्यावी, अशी मागणी सीबीआयने कोर्टाकडे केली आहे.