मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. आयोगाने सदर परीक्षा पद्धती ही 2023 पासून लागू होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या बदलांच्या अनुषंगाने संबंधित परीक्षांची परीक्षा योजना, अर्ज स्वीकारण्याची पद्धत, अहर्ता, वयोमर्यादा, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, अभ्यासक्रम इत्यादीबाबत सविस्तर तपशील आयोगाच्या वेबसाईटवर स्वतंत्रपण प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 


 






आयोगाच्या शासन सेवेतील विविध संवर्गाकरीता राबवण्यात येणाऱ्या विद्यमान भरतीप्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या, उमेदवार आणि प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण, भरतीप्रक्रियेस होणारा विलंब, गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन करावयाच्या विविध उपाययोजना तसेच भविष्यातील नियोजन या सर्व गोष्टींचा विचार करुन आयोगामार्फत या सुधारणा करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 


काय आहेत प्रमुख सुधारणा?



  • सर्व गट अ आणि गट ब संवर्गाकरीता यापुढे वर्णनात्मक स्वरुपाच्या मुख्य परीक्षेच्या आधारे निवडप्रक्रिया राबवण्यात येईल. 

  • गट अ आणि गट ब संवर्गाकरीता एकच पूर्व परीक्षा घेण्यात येईल.

  • उमेदवारांकडून सर्व संवर्गासाठी विकल्प हो किंवा नाही या पद्धतीने भरून घेण्यात येईल. त्याच आधारे प्रत्येक पूर्व परीक्षेसाठी स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल.

  • संयुक्त पूर्व परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरीता संबंधित संवर्गासाठी म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा, कृषी सेवा मुख्य परीक्षा इत्यादी परीक्षांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल. 


मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प ठेवण्यात येईल. त्यानंतर संबंधित संवर्गासाठी निवडप्रक्रिया राबवण्यात येईल. 2023 पासून MPSC मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.