परभणी : मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडात आज मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात खासदार संभाजीराजे छत्रपती राज्य सरकारवर चांगलेच कडाडले. त्यांनी मराठा आरक्षणाच्या संबंधित राज्यातील विद्वानांची समिती गठीत करून सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्याआधी आम्हाला त्या संदर्भातील माहिती सांगा, शिवाय या 420 एमपीएससी पास विद्यार्थ्यांना अजूनही नियुक्त्या का नाहीत? याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी द्यावे असं आवाहनही त्यांनी केले.
नांदेड शहरातील वामनराव पावडे मंगल कार्यालयामध्ये आज सकल मराठा समाज व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याचे आयोजन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आले होते. या मेळाव्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांच्यासह राज्यभरातील विविध मराठा समाजातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होते.
संभाजी राजे छत्रपती यांच्या भाषणानंतर भाषण केलेल्या नरेंद्र पाटलांची जीभ मात्र घसरली. त्यांनी आरक्षणबाबत सरकार वर अत्यंत खालच्या शब्दात टीका केली. महत्त्वाचे म्हणजे समोर महिला बसल्या असताना, शिवाय संभाजी राजे छत्रपती यांच्या समोर त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. नरेंद्र पाटील यांनी केलेल्या विधाना बाबत आम्ही संभाजी राजेंना विचारलं असता त्यांनी यावर मात्र मोन बाळगलं.
नरेंद्र पाटलांची खालच्या शब्दात सरकारवर टीका
भाजप आणि शिवसेनेची सत्ता होती तेव्हा राज्यात मूक मोर्चे काढण्यात आले. मात्र कुणालाही अडवण्यात आले नाही. आज तुम्ही कोल्हापूरमध्ये परिषद घेतली की अडवता. पंढरपूरमध्ये मशाल मोर्चा काढला त्यांना आडवता, का तुमची फाटली आहे का? हवा गेली नालायक साले असल्या शब्दात उपस्थित महिलांसमोर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. शिवाय या सरकारने मराठा मुलांची इतकी गंभीर अवस्था केलीये की एमपीएससीच्या मुलांचे फोन येत आहेत. साहेब आम्ही जीव द्यावा म्हणून मला जर परवानगी असते तर तलवारीने तीन-चार जणांना मी भोसकलं असतं, असं गंभीर विधानही नरेंद्र पाटील यांनी केले.