अकोला : मराठा आरक्षणावर सद्यस्थितीत समाजाची भूमिका काय असावी? यासंदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपती सध्या राज्यभराच्या दौऱ्यावर आहेत. ते आज मराठा समाज जनसंपर्क दौऱ्याच्या निमित्ताने अकोल्यात आले होते. यावेळी अकोल्यातील मराठा मंगल कार्यालयात झालेल्या एका छोटेखानी सभेत त्यांनी समाजाशी संवाद साधला. या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी त्यांच्यावर सध्या काही नेत्यांकडून होत असलेल्या टीकेला जोरदार उत्तर दिलं. 


अलिकडेच नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. या तिन्ही नेत्यांच्या टीकेवर संभाजी राजेंनी तिरकस टोला लगावला आहे. आपण आता मोठा व्हायला लागल्यानंतरच या लोकांकडून अशी टीका होत असावी, असं संभाजीराजे म्हणालेत. आपण अशा टीकेकडे कधीच लक्ष देत नसल्याचं ते म्हणालेत. आपण छत्रपतींचे वारसदार असल्यानं आपली बांधिलकी कायम समाजाशी असल्याचं ते म्हणालेत.


मराठा आरक्षणावरून संभाजी राजेंची 'महाविकास आघाडी' आणि आधीच्या 'महायुती' सरकारवर टीका : 
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे यांनी आज महाविकास आघाडीसह आधीच्या महायुतीच्या सरकारवर जोरदार टीका केली. दोन्ही सरकारांनी श्रेयवादाच्या भांडणात हा प्रश्न मार्गी लावला नसल्याचे ते म्हणालेत. मराठा आरक्षणासंदर्भात सध्या निर्माण झालेल्या तिढ्यासाठी हे सर्वच पक्ष कारणीभूत असल्याची टीका खासदार संभाजीराजेंनी केली. 


लोकप्रतिनिधींनो! आता तुम्ही उत्तर द्या! : खासदार संभाजीराजे छत्रपती 
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आधी समाज बोलला. लोकही बोललेत. समाजानं आपल्या हक्कांसाठी आंदोलनं अन् महामोर्चेही काढलेत. आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारनं हाती घ्यावा. त्यासाठी आता सरकारवर दबावासाठी समाजानं लोकप्रतिनिधी असलेल्या खासदार-आमदारांना जाब विचारावा. अन् आता समाजाला या लोकप्रतिनिधींनी उत्तर द्यावं, असं खासदार संभाजीराजे म्हणालेत. मराठा आरक्षणावर न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्रानं वटहुकूम काढावा आणि घटनादुरुस्ती करावी अशी मागणी संभाजीराजेंनी करीत मराठा आरक्षणाचा चेंडू आता केंद्राच्या कोर्टात सरकविला.


संभाजीराजेंनी 'महाराजा' खुर्ची नाकारत दिला साधेपणाचा प्रत्यय : 
अकोल्यात आज संभाजीराजेंचा कार्यक्रम असलेल्या मराठा मंगल कार्यालयात त्यांच्यासाठी व्यासपीठावर खास 'महाराजा' खुर्ची ठेवण्यात आली होती. यावेळी राजेंनी व्यासपीठावरची राजसिंहासनाच्या प्रतिकृतीची 'महाराजा' खुर्ची नाकारली. अन् व्यासपीठावरील इतर पाहूण्यांसारखी खुर्ची मागवून त्यावरच संभाजीराजे बसले. आपण मराठा समाजाचा सेवक असून नेता नसल्याचं महाराजांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं. दरम्यान, त्यांच्यासंदर्भातील मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर राजेंनी सावध भूमिका घेत आपण जनतेचा सेवक असल्याचं म्हटलं.