पंढरपूर : "हजारो कोटी रुपयाची कर्जे बुडवणाऱ्या उद्योगपतींची नावे केवळ देशाची बदनामी होते म्हणून जाहीर केली जात नाहीत. सातव्या आयोगासाठी 3 टक्के नोकरदारांना वर्षाला 1 लाख 15 हजार कोटींची वाढ देता, मात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास टाळाटाळ करणारे मोदी पुढच्या वेळी मते मागायला येतील, तेव्हा देशातील 62 टक्के शेतकरी त्यांना याचा जाब विचारेल. त्यामुळे एकतर कर्जमुक्ती द्या नाहीतर घरी बसा हे म्हणावे लागेल." असा सणसणीत इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला. भीमनगरमधील कर्जमुक्ती परिषदेत राजू शेट्टी बोलत होते.


आता कर्जमुक्ती मुद्द्यावर कोणाशीही संघर्ष करण्यास आपण तयार असल्याचे सांगत यासाठी देशभरातील सर्व शेतकरी संघटनानी एकत्रित हा लढा उभारला असून वेळ पडल्यास सर्वोच्च न्यायालयात देखील दाद मागू, असे शेट्टींनी सांगितले.

पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी यांना मते मागायला यायचे असेल, तर सात-बारा कोरा करावा लागेल, नाहीतर त्यांना घरी बसा सांगावे लागेल, अशी टीका राजू शेट्टींनी केली.

केवळ दोन एकर कोरडवाहू शेती असलेल्या सदाभाऊंचा उल्लेख करत कष्ट केल्यावर मंत्रिपद मिळतं, असा सल्ला देखील राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना दिला.

देशभरातील सर्व शेतकरी संघटना कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या मुद्द्यावर एकवटल्या असून हा निर्णय केंद्र सरकारला घेण्यास भाग पाडू असेही यावेळी शेट्टी यांनी सांगितले.

"देशभरातील शेतकरी कर्जबाजारी होण्यास समाज आणि चंगळवादी लोके जबाबदार असल्याचे सांगताना यांच्या चंगळवादामुळे, वाढत्या औद्योगिकरणामुळे आणि प्रदूषणामुळे पृथ्वीचे तापमान वाढू लागले असून यामुळेच निसर्गचक्र बिघडले आहे. शेतकरी पिक घेतो मात्र त्याच्या दराबाबत सरकार हस्तक्षेप करते आणि दर पाडते यामुळे कर्जे काढून देखील त्याला पैसे मिळत नाहीत तर दुसऱ्या बाजूला निसर्ग अडचणीत आणतो यामुळे या कर्जाला शेतकरी जबाबदार नाही." राजू शेट्टी यांनी सांगितले.