भर रस्त्यात बंद पडलेली बस खासदारांनी ढकलली!
एबीपी माझा वेब टीम | 04 Feb 2017 08:44 AM (IST)
अहमदनगर : अहमदनगरच्या एएमटी या बस वाहतूक सेवेचा काल बोजवारा उडाला. शुक्रवारी मुख्य मार्गावर बस बंद पडल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला. बस ड्रायव्हरनं बस सुरु करण्याचा प्रयत्न केला. पण बस सुरुच होत नसल्यानं खासदार दिलीप गांधी यांच्यासह नागरिकांवर बस ढकलण्याची वेळ आली. खासदार दिलीप गांधी यांच्यासह नागरिकांनी काही अंतरावर बस ढकलली. त्यातच बसचा ब्रेक फेल झाल्यानं नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. ऐन गर्दीच्या वेळी बस बंद पडल्यानं वाहतुकीचे तीन तेरा वाजले. त्यावेळी खासदारांनाच आपल्या गाडीतून बाहेर पडत बसला धक्का द्यावा लागला. शुक्रवारी संध्याकाळी न्यू आर्टस, कॉमर्सच्या आणि सायन्स कॉलेजच्या परिसरात बस बंद पडली. कॉलेजमध्ये पदवीदरचं मतदान केंद्र असल्यानं मोठी गर्दी होती. त्यातच बस बंद पडल्यानं नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं.