Medha Kulkarni : कराडच्या यशवंत सहकारी बँकेतील (Yashwant Bank)  सुमारे 140 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे नेते शेखर चरेगावकर यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. मेधा कुलकर्णी यांनी आज कराडमध्ये ठेवीदार व कर्जदारांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर त्या बोलत होत्या. 

ठेवीदारांना न्याय मिळवून देईपर्यंत लढा सुरु ठेवणार 

भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी कराडच्या यशवंत सहकारी बँकेतील सुमारे 140 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते शेखर चरेगावकर यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली आहे. कराडमधील शासकीय विश्रामगरात ठेवीदार व कर्जदारांच्या व्यथा जाणून घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी ठेवीदारांना न्याय मिळवून देईपर्यंत लढा सुरु ठेवणार असल्याची घोषणा केली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी या प्रकरणी भेट घेत सीबीआय मार्फत या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आपण केली असून अमित शाह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती खासदार मेधा कुलकर्णी यांनी ठेवीदारांना दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी भाजप नेते शेखर चरेगावकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतली दखल

दरम्यान, या प्रकरणाची केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी गांभीर्याने दखल घेतली असून येत्या दोन महिन्यांत या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच सीबीआय चौकशीच्या मागणीवर शाह सकारात्मक आहेत. त्याबाबत चरेगावकर यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कोरोना काळात चरेगावकर यांचे व्यक्तिगत असलेले व्यवसाय अडचणीत आले. त्यातच काही कर्जदारांनी चरेगावकर यांच्या वाई अर्बन बँकेतील थकीत कर्जाचा मुद्दा उपस्थित करीत त्यांच्या यशवंत बँकेच्या अध्यक्षपदावर आक्षेप घेतला. त्यात चरेगावकरांना यशवंत बँकेच्या अध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आले. त्यानंतर नव्या अध्यक्षांनी वसुलीबाबत कठोर भूमिका घेतल्या. पण, बँकेचा ताळेबंद व्यवस्थित झालेला नाही. त्यामुळे ठेवीदारांना वेळेत व पुरेसे पैसे मिळत नसल्याने या बँकेची प्रतिमा पुन्हा मलिन झाली आहे. आता तेथे इतर कारभारी कारभार पाहत आहेत. पण, अमित शाहांकडे झालेल्या तक्रारींमुळे पुन्हा एकदा चरेगावकर मात्र चर्चेत आले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बीडच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळ्यातील सुरेश कुटेला 6 दिवसांची पोलीस कोठडी, 80 लाखांच्या अपहारप्रकरणी न्यायालयाचा आदेश