Nanded Congress News : दिवंगत खासदार वसंत चव्हाण (MP Vasant Chavan) यांच्या अभिवादनासाठी आज नायगाव येथे 'चला साहेबांचे स्वप्न करुया साकार' या शोक सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी 1 वाजता नायगाव येथील जयराज पॅलेस येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र, या कार्यक्रमाची चर्चा एका बॅनरवरुन होताना दिसत आहे. बॅनरमध्ये काँग्रेस (Congress) पक्षाच्या सर्व नेत्यांचे फोटो आहेत, तसेच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचेही फोटो आहेत. मात्र या बॅनरवर नुकतंच भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या भास्करराव खतगावकर (Bhaskarrao Khatgaonkar) यांचा फोटो नाही. त्यामुळे या कार्यक्रमाची जोरदार चर्चा रंगत आहे.


कोण आहेत भास्करराव खतगावकर?


भास्करराव खतगावकरांचा पक्षप्रवेश झाल्यापासूनच नायगाव विधानसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेली आहे. भास्करराव खतगावकर हे नांदेड जिल्ह्यातील भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे  मेहुणे  आहेत. काही दिवसापूर्वीच भास्करराव खतगावकर यांच्यासह त्यांच्या  स्नुषा मीनलताई खतगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. भास्करराव खतगावकर यांनी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचं म्हटलं. खतगावकर यांचा काँग्रेस प्रवेश भाजप आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.


26 ऑगस्टला झालं होतं खासदार वसंत चव्हाण यांचं निधन  


नांदेडचे खासदर वसंत चव्हाण (Vasantrao Chavan) यांचं 26 ऑगस्टला निधन झालं होता. अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरु असतानाचं त्यांचा मृत्यू झाला होता.  


वसंत चव्हाण खासदार होण्याआधी महाराष्ट्राच्या विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय मे 2014 मध्ये त्यांची विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. ते जनता हायस्कूल आणि अ‍ॅग्रीचे अध्यक्षही होते. नांदेड जिल्ह्यात 2009 साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्यानं निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतराव चव्हाण ठरले. नांदेडमध्ये अशोक चव्हाण-भास्करराव खतगावकर या नेत्यांविना काँग्रेस जिंकू शकते, हे त्यांनी मोठ्या आश्वासकतेनं सिद्ध करत नांदेडमधील काँग्रेसचे वर्चस्व कायम राखलं होतं. 


महत्वाच्या बातम्या:


Vasant Chavan Death : सरपंच ते खासदार! चार दशकांंचं जाज्वल्य राजकारण, वसंत चव्हाण यांचा राजकीय इतिहास कसा होता?