जालना : जालना जिल्ह्यातील अंबड (Jalna Ambad Suicide case) तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील एका विवाहितेने कौटूंबिक वादातून पोटच्या चार लेकरांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गंगासागर ज्ञानेश्वर अडाणी (32), भक्ती (13),ईश्वरी(11), अक्षरा(9) व मुलगा युवराज (7) अशी मृतांची नावं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील घुंगर्ड हादगाव गावातील ज्ञानेश्वर प्रल्हाद अडाणी हे पत्नी गंगासागर अडाणी व तीन मुली आणि एक मुलासह गावात राहतात. काल 30 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान गंगासागर या तीन मुली आणि मुलासह शेतात चक्कर मारायला गेल्याचे अनेकांनी पाहिले.
गंगासागर यांनी मुलामुलीसह सायंकाळी 5.30 शेतातच वेळ घालवला. सात वाजेपर्यंतही गंगासागर व मुलं, मुली घरी परतले नसल्याने ज्ञानेश्वर अडाणी व गावातील नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत त्यांची शोधाशोध केली. परिसरातील सर्व विहिरी व जायकवाडी डावा कालवा परिसर पिंजून काढला मात्र त्या आढळून आल्या नाहीत.
रात्री झाली घरी न आल्यामुळे घरच्यांनी व गावातील काही लोकांनी त्यांचा शोध सुरू केला. गावकरी व अडाणी कुटुंबातील सदस्य यांनी ही आजूबाजूच्या शेतात व विहिरी पिंजून काढल्या. त्यानंतर रात्रभर शोध घेऊनही त्यांचा काही शोध लागला नाही. परंतु सकाळीच काहींच्या नजरेत अडाणी यांच्या शेताशेजारील गणेश फिस्के यांच्या शेतातील विहिरीत या पाचही जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. गंगासागर अडाणी यांनी आपल्या चार मुलांसह विहिरीत उड्या घेत आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान या घटनेची माहिती गोदी पोलीस ठाण्यात मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्यासह कर्मचारी हजर झाले. या पाचही जणांचे मृतदेह विहिरीबाहेर काढून जाग्यावर शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी गोंदी पोलिसांनी ज्ञानेश्वर अडाणी यांनी ताब्यात घेतले आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा