मान्सूनचा वेग लांबणीवर, 15 जूननंतरच राज्यात पाऊस; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी महत्त्वाचे आवाहन
मान्सूनचे आगमन लांबवणीवर पडल्याने शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या या अंदाजानुसारच आपली शेतीची काम करायला हवीत.

मुंबई : गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सुरू असलेल्या उष्णतेमुळे (Summer) आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून चातकाप्रमाणे मान्सूनच्या (Monsoon) पावसाची वाट पाहिली जात आहे. सध्या मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र, त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे, या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची (Rain) शक्यता कमी आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
मान्सूनचे आगमन लांबवणीवर पडल्याने शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या या अंदाजानुसारच आपली शेतीची काम करायला हवीत. कारण, 15 जूनपर्यंत पेरणीसाठीचा पाऊस पडणार नसल्याची माहिती सीएमओने दिली आहे. तसेच, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असेही सांगण्यात आलंय. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. तसेच, विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे, अशी सूचना संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.
हलक्या सरींचा अंदाज
राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण प्रदेशातील काही भाग आणि मराठवाड्यात वादळी पावसाची स्थिती आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांत दक्षिण कोकण, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता कमीच आहे. तर राज्यातील उर्वरित बहुतांश भागांना हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' देण्यात आला असून काही भागात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला आहे.
हेही वाचा
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
महत्त्वाच्या बातम्या























