मुंबई: काँग्रेसप्रणित यूपीए सरकारकडून सरसंघचालक मोहन भागवत यांचं नाव दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याचा प्रयत्न झाला होता, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे.


‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्त वाहिनीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मोहन भागवत यांना हिंदू दहशतवादी म्हणून अडकवण्याचा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमधील काही मंत्र्यांचा प्रयत्न होता, असं या वृत्तात म्हटलं आहे.

अजमेर आणि मालेगाव बॉम्बस्फोटानंतर यूपीए सरकारनं यामागे ‘हिंदू दहशतवाद थिअरी’ मांडली होती. या अंतर्गतच मोहन भागवत यांना अडकवण्याचा प्रयत्न होता. यासाठी एनआयएच्या बड्या अधिकाऱ्यावर दबाव टाकण्यात येत होता, असंही या वृत्तात म्हटलं आहे.

अजमेर आणि इतर ठिकाणी झालेल्या स्फोटांप्रकरणी मोहन भागवत यांची चौकशी करायची इच्छा तपास अधिकारी आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना होती. हे अधिकारी यूपीएतील मंत्र्यांच्या आदेशानुसार काम करत होते. यामध्ये तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचाही समावेश होता. या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी भागवत यांना ताब्यात घ्यायचं होतं, अशी माहिती ‘टाइम्स नाऊ’ला फाईलमधील नोंदीवरून मिळाली आहे.