सांगली : जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम म्हणून ओळख असलेली बाणूरगड, ताडाचीवाडी व कुसबावडे ही तीन गावे अद्यापही मोबाईलच्या इंटरनेटपासून वंचित आहेत. मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने कोरोनामुळे बंद झालेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास सध्या घराच्या छतावर सुरू आहे. जिल्ह्यातील शाळा कोरोना काळात बंद राहिल्या. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग शोधण्यात आला. परंतु, नेटवर्क नसल्यामुळे मुलांना ऑनलाईन शिक्षण घेता आले नाही. 


बाणूरगड, ताडाचीवाडी आणि कुसबावडे ही तीन गावे खानापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसली आहेत. या गावांभोवती पूर्णपणे चारही बाजूनी डोंगरी भाग असून पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या या गावांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नेटवर्कची समस्याही या गावांना सतावत आहे.


कोरोना काळात अतिगंभीर रुग्णांसाठी रुग्णवाहिका मागवायची असल्यास शुक्राचार्यपर्यंतचा दोन किलोमीटरचा प्रवास करून संपर्क साधावा लागत आहे. हे कमी म्हणून की काय नेटवर्क मिळत नसल्याने गावातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण देखील बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे कोरोना काळापासून शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु, या तिन्ही गावांत विद्यार्थ्यांना पुरसे नेटवर्क व इंटरनेट सुविधा मिळत नसल्याने घराच्या छताचा आधार घ्यावा लागत आहे. 


अनेक विद्यार्थी उंच असलेल्या दुमजली इमारतीच्या छतावर बसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांसह नागरिक व नोकरदारांचेही हाल होत आहेत. याकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन बाणूरगड, ताडाचीवाडी आणि कुसबावडे या तीन गावांसाठी मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिक आणि गावातील विद्यार्थी करत आहेत. 


महत्वाच्या बातम्या



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI