Amol Mitkari VS MNS: गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणातील नेत्यांमधील वाद वाढत चालल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मनसैनिकांनी मिटकरींची (Amol Mitkari) गाडी फोडली होती, त्यानंतर देखील अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray)  टीका करणं सोडलं नसल्याचं दिसत आहे. मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारीबाज देखील म्हटलं होतं, त्यानंतर आता मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आमदार अमोल मिटकरींवर हल्लाबोल केला आहे. 


योगेश चिले म्हणाले, अमोल मिटकरी यांना कुठलीही माहिती नसताना राज ठाकरेंवर  (Raj Thackeray) त्यांनी टीका केली आहे. आता अमोल मिटकरी यांना राज्यात घासलेट चोर म्हणून ओळखतील. मिटकरी यांच्या वडिलांचा रेशन दुकान होतं. मृत व्यक्तींचा किंवा बाहेर गावी गेलेल्या व्यक्तीच्या नावाने येणारे रेशन, दुकानातील घासलेट रॉकेल हे मिटकरी (Amol Mitkari) आणि त्यांचे वडील चोरायचे आणि अशा या घासलेट चोराला अजित पवार यांनी आमदार कसा केलं? अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता तरी सुद्धा अशा चोराला आमदारकी दिली? असा सवाल देखील योगेश चिले यांनी उपस्थित केला आहे.


रेशनिंगचा त्यांचा लायसन सुद्धा रद्द करण्यात आला होता. 2016 साली हा गुन्हा दाखल करण्यात आला, यांच्यावर गुन्हा दाखल असताना सुद्धा त्यांना आमदारकी कुठली शहानिशा न करता देण्यात आली. ते बोलतील तशी आम्ही त्यांची विविध प्रकरणे बाहेर काढत राहू असा इशारा देखील यावेळी योगेश चिले यांनी दिला आहे.


पुढे बोलताना योगेश चिले म्हणाले, डॉक्टर प्रवीण लोखंडे अकोला जिल्हा उपनिबंधक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर अँटी करप्शनने कारवाई केली. त्यांना निलंबित करण्यात आलं होतं, त्यानंतर ते काही दिवस तुरूगांत देखील होते, त्यांना पुन्हा पदावर बसवण्यासाठी आणि परत आणण्यासाठी अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) खोट्या गोष्टी लिहल्या. दिलीप वळसे पाटील यांच्यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुन्हा अकोल्यात त्यांची बदली करून घेतली. दिलीप वळसे पाटील तेव्हा गृहमंत्री होते. प्रवीण लोखंडेंची पुन्हा नियुक्ती करण्यात आली तो आता तिथे त्याच्या विरोधातील पुरावे नष्ट करत आहे, प्रवीण लोखंडे यांचे प्रकरण अजून संपलेलं नाही. निवडणुकीच्या काळात सुद्धा त्यांना तिथेच कार्यरत ठेवलं होतं. त्यामुळे या प्रकरणावर देखील सरकारने लक्ष घालावं अशी मागणी योगेश चिले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


 आता फक्त दोन प्रकरणे आम्ही बाहेर काढली आहेत. अजूनही त्यांची अनेक प्रकरण आहेत. जेणेकरून सुपारी बाज कोण आहे हे अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना कळेल. भाजपासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे, त्यामुळे ही सगळी प्रकरण दाबली जात आहेत का? देवेंद्र फडवणीस यांनी या प्रकरणांमध्ये लक्ष घालावं आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी असंही योगेश चिले यावेळी म्हणाले आहेत.