मुंबई : वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भाजपच्या वीज बिल होळी आंदोलनानंतर आज मनसेने वाढीव वीज बिलांविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबादेत मनसेने वाढीव वीज बिलांविरोधा एल्गार पुकारला आहे. जनतेला न्याय देण्यासाठी आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चे आयोजित केले आहेत. आज संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. एकाच वेळी संपूर्ण राज्यात निघणाऱ्या या मोर्चामध्ये अनेक लोक सहभागी झाले आहेत.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला वीज बिल भरू नका असं आवाहन केलं आहे. जर वीज कनेक्शन कापायला कोणी आलं तर संघर्ष हा महाराष्ट्र सैनिकांसोबत होणार आहे, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. वीज बिल भरु नका, असं आवाहन राज ठाकरे यांनी पत्राद्वारे महाराष्ट्राला केलं आहे, असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसेच हे पत्र मनसे पदाधिकाऱ्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. तसेच वीज बिल भरलं नाही म्हणून वीज कनेक्शन कापायला कोणी आलं, तर त्यांच्या कानाखाली इलेक्ट्रिक शॉक काढायला महाराष्ट्र सैनिक तयार आहेत, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे.



पूर्ण राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन झालेल्या कालावधीमध्ये विजेचा वापर जास्त झाल्याचे कारण देत महावितरणच्या वतीने राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिल पाठवण्यात आली. अव्वाच्या सव्वा वीज बील असल्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. राज्य सरकारने ही वीज बिलं दुरुस्त करुन देण्याची देण्याचं आश्वासनही दिलं होतं. मात्र पुन्हा राज्य सरकारने घूमजाव केल्यामुळे वीज ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज (26 नोव्हेंबर) संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर एकाच वेळी
वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ आणि शासकीय धोरणांच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन केलं आहे.


राज्यांतील अनेक ठिकाणी मनेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरिदेखील मोर्चा काढण्यावर मनसे ठाम आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं आहे. मनसे नेते अविनाश जाधव, अभिजीत पानसे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली. त्यावेळी अनेक मनसे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधातही घोषणाबाजी केली.


ठाण्यात मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट


ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांना वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरुन आंदोलन केलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सरकार विरोधात घोषणा दिल्या. आंदोलना दरम्या पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. त्यावेळी पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.


नवी मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांचा वी बिल वाढीविरोधात एल्गार


कोरोना काळात सर्वसामान्य लोकांना वीज मंडळाने पाठवलेली हजारो रूपयांची बिलं कमी करण्यात यावी यासाठी मनसेकडून आज आंदोलन हाती घेण्यात आली आहे. नवी मुंबईतील मनसेकडून सिबीडी येथे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने अनेक वेळा आश्वासन देऊनही वीज बिलात कोणत्याही प्रकारची सूट मात्र अद्याप दिलेली नाही. कोरोना काळात आधीच लोकांच्या नोकऱ्या गेल्या असताना पाठवण्यात आलेली हजारो रूपयांची बिलं भरायची कशी, असा प्रश्न गोरगरिबांना पडला आहे. त्यामुळे सरकारने त्वरित वीज बिलात सवलत द्यावी, अशी
मागणी मनसेने केली आहे.



पुण्यात मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात


पुण्यात मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे शनिवार वाड्यासमोर जमलेल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. मनसेचे कार्यकर्ते जसे शनिवार वाड्याजवळ पोहोचले, तसे पोलीस त्यांना ताब्यात घेऊन गाडीत घालून पोलीस स्टेशनला नेत आहेत. मनसेच्या मोर्चाला परवानगी नसल्याने कारवाई होत असल्याचं पोलिसांच म्हणणं आहे. तर पोलिसांनी आज सकाळी परवानगी नाकरल्याच मनसे नेत्यांच म्हणणं आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आपण पोलीस स्टेशनमधेच आंदोलन सुरु करणार असल्याचं मनसे नेत्यांनी म्हटलं आहे.


जालन्यात मनसेचा आक्रोश


वीज बिल माफ करावं या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेनं मोर्चा आंदोलन केलं आहे. कोरोनावर दुर्लक्ष करून हे सरकार भरमसाठ वीज बिल जनतेच्या माथी मारत आहे. त्यामुळं राज ठाकरे यांनी राज्यपाल आणि शरद पवार यांची भेट घेवून वीज बिल माफ करण्याची विनंती केली होती. मात्र तरीही सरकारनं याकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यानंतर राज ठाकरेंच्या सूचनेनुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेनं मोर्चा काढला. दरम्यान वीज बिल माफ झालं नाही आणि महिला बचत गटांचं कर्ज माफ झालं नाही. तर आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेनं दिला आहे.



औरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून आंदोलन


पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही औरंगाबादमध्ये मनसेनं आंदोलन केलं. औरंगाबाद शहरातील औरंगपुरा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार होता. मात्र तत्पूर्वी पोलीसांनी या मोर्चाला परवानगी दिली नव्हती. तरीही मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी कार्यकर्त्यांसह औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकांमध्ये वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन सुरु केलं. या आंदोलनात औरंगाबाद शहरातील मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे औरंगपुरा भागांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढविल्याने छावणीचे स्वरूप आलं होतं. पोलिसांचा बंदोबस्त असतानाही मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.


नागपुरातही मनसेचं वाढीव वीज बिलांविरोधात आंदोलन


नागपुरात संविधान चौकातून मनसेचा वाढीव वीज बिल रद्द करण्याचा मागणी करण्यासाठीचा मोर्चा मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी संविधान चौकाजवळ आरबीआय समोर मनसेचा मोर्चा बॅरिकेट लावून अडवला. पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्याची परवानगी दिली नाही.