मुंबई : मनसेने सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळण्यासाठी केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनाप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे गजानन काळे, संतोष धुरी आणि अतुल भगत या चौघांना कर्जत रेल्वे पोलिसांनी आज सकाळी अटक केली होती. या चौघांचीही कल्याण रेल्वे कोर्टाने प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर मुक्तता केली.


मनसेनं सोमवारी मुंबई आणि उपनगरात सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी विनापरवानगी लोकल प्रवास करून सविनय कायदेभंग आंदोलन केलं होतं. यामध्ये मनसेचे संदीप देशपांडे, गजानन काळे, संतोष धुरी आणि अतुल भगत या चौघांनी शेलू ते कर्जत दरम्यान लोकल प्रवास केला. याप्रकरणी कर्जत रेल्वे पोलिसांनी या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी सकाळी हे चौघेही कर्जत रेल्वे पोलिसांसमोर हजर झाले. यानंतर या चौघांना कल्याण रेल्वे कोर्टात हजर केलं असता सुरुवातीला त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र त्यानंतर मनसेने केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान कोर्टाने या चौघांचीही प्रत्येकी 15 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर मुक्तता केली.


यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी या चौघांचं न्यायालयाबाहेर जोरदार स्वागत केलं. यानंतर संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. सरकार आम्हाला घाबरवण्याचा आणि दडपशाही करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र आम्ही अशा दडपशाहीला भीक घालत नसून सरकार घाबरलं असल्याचं ते महणाले. आमच्यावर चुकीची कलमे लावण्यात आली असून आमच्यावर इतकी दडपशाही करायला आम्ही आतंकवादी आहोत का? असा सवालही देशपांडे यांनी विचारला. तसंच आमची ऍलर्जी असेल तर रेल्वे संघटनांशी चर्चा करा पण सर्वसामान्यांना रेल्वेप्रवासाची परवानगी मिळालीच पाहिजे, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली.


संबंधित बातम्या :