Rohit Pawar : वादग्रस्त वक्तव्यामुळं चर्चेत राहणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्का दिला आहे. कृषी विभागातील बदल्यांचे कोकाटे यांचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांनी काढून स्वतःकडे घेतले आहेत. कृषी खात्यांमधील बदल्या आणि अन्य कामांच्या मोठया प्रमाणावर तक्रारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी बदल्यांच्या तक्रारींकडे प्राधान्याने लक्ष दिले आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. 

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

कृषी खात्यातील महत्त्वाच्या बदल्यांचे अधिकार कृषीमंत्र्यांकडून काढून स्वतःकडे घेत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा एकाधिकारशाहीकडं त्यांचा कल असल्याचं दाखवून दिल्याचे रोहित पवार म्हणाले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून फडणवीस साहेबांनी ठळक असं काही केलं नसलं तरी एकाधिकारशाही मात्र मजबूत केली आहे. मंत्र्यांचे विशेषतः मित्रपक्षांच्या खात्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवण्यासाठी शक्य त्या उपाययोजना मुख्यमंत्र्यांकडून केल्या जात आहेत. मित्रपक्षांना आपल्या एकाधिकारशाहीच्या धाकात ठेवण्याचे भाजपचे मनसुबे आता महाराष्ट्राला कळाले असल्याचे रोहित पवार म्हणाले.  

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन आश्वासनांची पूर्तताही करावी

ज्याप्रमाणे बदल्यांचा अधिकार मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे घेतला आहे. त्याप्रमाणेच राज्यभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तताही करावी, ही विनंती असे रोहित पवार म्हणाले आहेत. 

नवीन निर्णयानुसार आता कृषि संचालक, सह संचालक आणि अधिक्षक कृषि अधिकाऱ्याच्या बदलीचे अधिकार मुख्यमंत्री फडणवीसांकडेच असतील. सामान्य राज्यसेवा गट अ आणि ब, महाराष्ट्र कृषी सेवा गट अ आणि ब (कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी), सामान्य राज्यसेवा गट अ आणि ब आदी संवर्गातील नियतकालिक बदल्यांचे अधिकार कृषी आयुक्तांना देण्यात आले आहेत. कृषी विभागाने (Department of Agriculture) गुरुवारी बाबाबतचा शासन निर्णय जारी केला. या निर्णयाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी कोकाटे यांच्या बदल्यांचे अधिकार मर्यादित केले आहेत. वादग्रस्त विधाने करून नव्यानव्या वादाला निमंत्रण देणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समज दिली होती. आता देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने कृषी विभागाने खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे धोरण स्पष्ट केले आहे. काही संवर्गातील अधिका-यांच्या मध्यावधी बदल्यांसाठी कृषीमंत्री सक्षम प्राधिकारी असले तरीही गट अ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना मुख्यमंत्र्यांची (CM) मान्यता घेणे आवश्यक राहील, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Raju Shetti : बेताल वक्तव्य करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिमंडळातून काढा; राजू शेट्टी आक्रमक, शेतकऱ्यांना का गंडवलं? अजितदादांनाही सवाल