Amravati News : अखेर आमदार रवी राणा यांना अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दिलासा आहे. आमदार रवी राणा यांना अखेर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपूलावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविला त्यादिवशी पासून अमरावतीत राजकारण खूप तापलं होतं. त्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने तो पुतळा हटवला आणि 9 फेब्रुवारी रोजी मनपा आयुक्तांवर युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शाइफेक केली. त्याच दिवशी रात्री उशिरा मनपा आयुक्त यांच्या तक्रारीवरून आमदार रवी राणा यांच्यासह 11 जणांविरुद्ध 307 चा गुन्हा दाखल झाला होता. रवी राणा यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. पोलीसांनी आमदार रवी राणा यांनीच कट रचण्याचा आरोप करत गुन्हा दाखल केल्याने त्यांना जामीन मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शुक्रवारी अटकपूर्व जामिनावर तब्बल अडीच तास युक्तिवाद झाला आणि अखेर आज न्यायालयाने आमदार रवी राणा यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. 

 

न्यायालयात काय झालं?

 

सरकारी वकील सुनील देशमुख यांनी युक्तिवाद केला की, रवी राणांची पोलीस कोठडी आवश्यक आहे. आम्हाला रवी राणा यांचा आवाजाचे नमुने घेऊन फॉरेन्सिक लॅबला पाठवायचं आहे. सोबतच मोबाईल जप्त करायचा आहे कॉल डिटेल्स आणि सिडीआर काढायचे आहे. या प्रकरणात एका आरोपीने कोर्टासमोर कलम 164 नुसार जबाब दिला आहे की, मनपा आयुक्तांना घटनास्थळी बोलविण्यासाठी आमदार रवी राणा यांनीच त्यांना फोन कॉल केला होता. तर आमदार रवी राणायांच्या कडून अॅड. प्रशांत देशपांडे यांनी युक्तिवाद केला, ते म्हणाले, रवी राणा यांच्या आवाजाचे नमुने आणि सिडीआर घेण्यासाठी कोठडीची आवश्यकता नाही. ज्या आरोपीने कलम 164 नुसार न्यायालयासमोर बयान दिले आहे. त्या आरोपीने महापालिका आयुक्तांना 9 वेळा कॉल केला आहे. त्यामुळे त्या आरोपीचीच मुख्य भूमिका आहे. मग पोलिसांनी त्याला अटक का केली नाही? आरोपींना अटक न करता कलम 164 अन्वये बयान कसे नोंदविले गेले. यावरून पोलीस राजकीय दबावाखाली नियमबाह्य कारवाई करीत असल्याचे स्पष्ट होत आहे..



संबधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha