Mira Bhayandar : काल मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, आता 'मराठी माणूस' जागा झाला, पोलीस उपायुक्तांना भेटणार
Mira Bhayandar : मनसेने मीरारोड येथील एका अमराठी व्यावसायिकाला चोप दिल्यानंतर काही अमराठी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करुन निषेध व्यक्त केला होता.

Mira Bhayandar : मीरारोड येथील एका अमराठी व्यावसायिकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसेच्या या मारहाणीनंतर मिरारोड आणि भाईंदर परिसरातील काही अमराठी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करुन निषेध व्यक्त केला. तसेच या व्यापाऱ्यांनी मोर्चा देखील काढला होता. आता यानंतर मराठी माणूस देखील जागा झाला आहे. आज संध्याकाळी 6 वाजता सर्व मराठी संघटना, राजकीय पक्षातील मराठी प्रतिनिधी आणि मराठी जनता एकत्र येऊन पोलीस उपायुक्तांची भेट घेणार आहेत.
सध्या मीरा-भाईंदर शहरात मराठी माणसांवर होत असलेल्या अन्यायाला विरोध करण्यासाठी सर्व मराठी संघटना, राजकीय पक्षातील मराठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी समाज मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. शहरात मराठी भाषेला दुय्यम स्थान देणे, मराठी व्यक्तींना घर देण्यास नकार देणे, तसेच विशिष्ट समाजाच्या नावाने शहरात तेढ निर्माण करण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे मराठी जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
मराठी माणूस पोलीस उपायुक्तांना भेटणार
गंभीर बाब म्हणजे पोलिसांकडून गुन्हा नोंदवूनही आरोपींवर कठोर कारवाई होत नसून, उलटपक्षी आरोपींकडून दुकाने बंद ठेवून जमाव गोळा करून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर, आज संध्याकाळी 6 वाजता सर्व मराठी संघटना, राजकीय पक्षातील मराठी प्रतिनिधी आणि मराठी जनता एकत्र येऊन पोलिस उपायुक्तांची भेट घेणार आहेत. या भेटीत मराठी समाजावरील अन्याय, पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि शहरात निर्माण होत असलेले सामाजिक तणाव याबाबत पोलिसांना निवेदन देण्यात येणार आहे.
नेमकं काय घडलं होतं?
जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाने मराठी भाषा बोलण्याची गरज काय, असे वक्तव्य केले होते. त्यावरुन मनसेचे कार्यकर्ते त्याला जाब विचारायला गेले होते. तेव्हादेखील या दुकान मालकाचा मराठी न बोलण्याचा हेका कायम होता. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी या दुकान मालकाच्या कानाखाली जाळ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























