जालना : मंत्रीपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नसल्याचं मोठं वक्तव्य काँग्रेस नेते, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. विजय वडेट्टीवार जालना दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाला धक्का लागेल, अशी भीती काही ओबीसी नेत्यांना वाटत आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी मराठा समाजाबरोबर आहोत. मात्र आम्हाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्या म्हणणे पूर्ण चुकीचं आहे. जर असा प्रयत्न झालाच तर मंत्री पद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचं विजय वडट्टीवार यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे ओबीसी समाजाचे पहिले मराठवाडास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती होती.
ओबीसी मेळाव्यात बोलताना वडेट्टीवार यांनी म्हटलं की, ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू. विजय वड्डेटीवार जिवंत आहे तोवर धक्का लावायचा विषय नाही. वाटेल ते काय काढायचं असेल तर काढू आपल्याकडे घोंगड आहे आणि काठी पण आहे. कोणाला कितीही देऊ द्या पण आमच्या हक्काचं नको. आमच्या वाट्याचं आरक्षण देऊ नका. आमच्या वाट्याला धक्का लावू नका, ही आमची विनंती आहे.
देवेंद्र फडणवीस काय सुप्रीम कोर्ट आहे काय?
देवेंद्र फडणवीस काय सुप्रीम कोर्ट आहेत काय? असं म्हणत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. भाजपच्या हातात सत्ता द्या मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं काही भाजप नेते वक्तव्य करत आहेत. मात्र फडणवीस काय सुप्रीम कोर्ट आहे काय? अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. आरक्षणाचा विषय आता राज्य सरकारच्या हातात नाही. हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर कोण सुप्रीम कोर्टात गेल. त्यावेळी कोण शुक्राचार्यानं बाजू मांडली माहिती नाही. मात्र हे मराठा समाजाचं दुर्देव असून फडणवीस काय सुप्रीम कोर्ट नाही, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.