शरद पवारांची ईव्हीएमवरील शंका म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे : सुधीर मुनगंटीवार
एबीपी माझा वेब टीम | 02 Jun 2019 08:19 PM (IST)
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित केली होती. त्यानंतर शरद पवारांच्या शंकेला उत्तर देताना सुधीर मुनगंटीवारांनी त्यांच्यावर टीका केली.
वर्धा : शरद पवार यांनी ईव्हीएमवर उपस्थित केलेली शंका म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे, अशी असल्याची मिश्कील टीका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. वर्ध्यात खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीला सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. निवडणूक जिंकता येत नाही त्यामुळे ईव्हीएमवर दोष दिला जात आहे. धूल थी चेहरे पे और आईना साफ करते रहे, असं साधारणतः राजकारण सध्या सुरु आहे. 47 वर्षे यांच्या हातात राज्याची सत्ता होती, पण अद्यापही यांना आम्ही राज्याचे सगळे प्रश्न सोडवले, असा दावा करता येत नाही, अशी टीकाही मुनगंटीवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली. काय म्हणाले होते शरद पवार? ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथे भाजपची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस विजयी झाला. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती. ही तिन्ही राज्ये एकमेकांना लागून आहेत आणि आता तेथील तत्कालीन सरकार भाजपा पाडण्याच्या विचारात आहे, असं शरद पवारांना म्हटलं.