Narayan Rane on Shivsena Merge : सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी शिवसेनेच्या फुटीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. शिवसेना तुटल्याचे मला आजही दु:ख आहे, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास खूप आनंदाची गोष्ट असल्याचे म्हटले आहे. यासोबतच ते म्हणाले की, मी काल जे बोललो त्यापासून मी मागे हटणार नाही कारण ते सत्य आहे. शिवसेनेचे दोन तुकडे मान्य नाहीत. फाळणी का झाली याचे कारण सर्वांना माहीत आहे.

Continues below advertisement

माझ्या मते दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाहीत 

दरम्यान, दोन्ही शिवसेनेच्या मलोमीलनाची चर्चा रंगल्यानंतर पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मते दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाहीत, असे राणे म्हणाले. दुसरीकडे, नितेश राणे यांनी संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर खोचक शब्दात टिप्पणी केली आहे. संजय शिरसाट संजय राजाराम राऊत होऊ नये, अशा शुभेच्छा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर शिरसाट यांनी नितेश राणे यांच्या एवढ्या मला शुभेच्छा मिळाल्या, त्याची मला काळजी घ्यावी लागेल, आता त्यांनी पहिल्यांदाच सूचना केली आहे म्हणून त्यावर मी भाष्य करणार नाही. मी इशारा देत नाही नितेश राणे इशारा देणारे नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

संजय राऊतला चांगलं दिसत नाही

दरम्यान, नारायण राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर तोफ डागली आहे. संजय राऊतला चांगलं दिसत नाही. तो ज्या बातम्या देतो त्या सगळ्या खोट्या असतात, दिशाभूल करणाऱ्या असतात अशी टीका भाजप नेते खासदार नारायण यांनी संजय राऊत यांच्यावर केली. उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे चांगलं काम करताहेत. काही दिवस ते गप्प होते, पुन्हा कामाला लागले आहेत. त्यामुळे त्याला चांगलं दिसत नसल्याने तो शब्द वापरतो, त्यामुळे त्याला एके दिवशी चांगलं बोलायला आम्ही शिकवू, असा टोलाही राणे यांनी यावेळी लगावला..

Continues below advertisement

'आम्ही एकत्र आलो तर आनंद होईल'

दरम्यान, भविष्यात दोघेही एकत्र येणार का? या प्रश्नाला उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले, "ते एकत्र आले तर आनंदाची बाब आहे. मात्र त्यासाठी मी वेगळे प्रयत्न करेन, असे नाही. एकत्र यायचे की नाही, यावर शिंदे साहेब काय निर्णय घेतील आणि उद्धव साहेब काय करतील? हे सांगायला मी काही विद्वान नाही." संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य अशावेळी केले आहे, जेव्हा नुकतेच उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपच्या काही नेत्यांना शिवसेनेसोबत युती हवी असल्याचा दावा केला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्यात झालेल्या संवादानंतर संजय राऊत यांनी हा दावा केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या