Radhakrishna Vikhe Patil on Sharad Pawar : महाराष्ट्र ज्यांना जाणता राजा म्हणत होता, त्यांनी कायम दुष्काळी भागाला पाणी देणे खर्चात बसत नसल्याची उत्तरे दिली होती असे म्हणत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी नाव न घेता शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. आता फडणवीस ज्या पद्धतीने दुष्काळ मुक्तीसाठी काम करत आहेत, ते पाहता नुसत्या तुताऱ्या फुकून काही होत नसतं असा टोला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. सांगोला उपसा सिंचन भूमिपूजन सोहळ्यानंतर आयोजित मेळाव्यात बोलताना विखे पाटलांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. 

संजय राऊत हे मनोरुग्ण, त्यांची जागा मेंटल हॉस्पिटलमध्ये 

सध्या राज्यात जवळपास दोन लाख कोटीचे सिंचन प्रकल्प व नदीजोड प्रकल्पाची कामे सुरू आहेत. पुढील पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचे स्वप्न आम्ही पहात असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. तसेच यावेळी विखे पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजदय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत हे मनोरुग्ण आहेत. त्यांची जागा मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे. आता त्यांच्या नेत्यांनीच ते पहावे अन्यथा जनता त्यांना जागा दाखवेल अशी टीका विखे पाटलांनी राऊतांवर केली. संजय राऊत यांनी संतोष देशमुख हत्येमागे भाजप आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. यावर बोलताना विखे पाटील यांनी टीका केली. विरोधकांना महायुतीने मिळविलेला विराट विजय पचनी पडला नाही. त्यामुळं कोण काय बोलते याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला.

मंत्री जयकुमार गोरेंचे दीपक साळुंखे आणि शहाजी बापू पाटील यांना टोले

तुम्ही दोघे भांडत बसला आणि तुला नाही मला नाही आणि घाल...अशा शब्दात ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दीपक साळुंखे आणि शहाजी बापू पाटील यांना टोले लगावले.  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहाजी बापू पाटील आणि दीपक साळुंखे हे दोघे वेगळे लढल्याने सांगोल्यातून शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख विजयी झाले होते. आज नेमके दीपक साळुंखे आणि शहाजी बापू पाटील हे दोघेही एकाच व्यासपीठावर आल्याने जयकुमार गोरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. जयकुमार गोरे यांनी दीपक साळुंखे यांची जोरदार खिल्ली उडवत मी तुमच्याकडे वसुलीसाठी आलेलो आहे.  माझ्यासोबत पाच पाच लाखाच्या लावलेल्या दोन्ही पैजा तुम्ही हरलात. अजूनही त्याचे पैसे दिलेले नाहीत अशा शब्दात गोरे यांनी साळुंखे यांची खिल्ली उडवली. 

बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचा भूमिपूजन समारंभ आज सांगोल्यात संपन्न झालाय या कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मंत्री जयकुमार गोरे, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, दीपक साळुंखे उपस्थित होते.