Hasan Mushrif on Ajit Pawar: 1999 साली मी निवडून आलो, दोन महिन्यात मला त्यांनी मंत्री केलं. नऊवेळा मंत्रिपदाची शपथ घेतली. दादा म्हणायचे की माझी शपथ झाली की साहेब (मुश्रीफ) तुमची शपथ होणारच. सहावेळा निवडून आलो आणि नऊवेळा मी मंत्री झालो. यावेळी ते मला सोडून गेले, असे म्हणताच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना शोक अनावर झाला. मुश्रीफ अजित दादांच्या आठवणी सांगताना त्यांना दृष्ट लागल्याचे म्हणत धाय मोकलून रडले. यावेळी सभागृह स्तब्ध झाल्याचे दिसून आले. अजितदादांच्या शोक प्रस्तावावर बोलताना अनेक नेत्यांना आज भावना अनावर झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही शेवटच्या अँटी चेंबरमधील भेटीचा प्रसंग सांगताना भावनिक झाल्याचे दिसून आले. रोहित पवार, अदिती तटकरे यांनाही भावना अनावर झाल्या.
तरी मी देखणा आहे का नाही?
हसन मुश्रीफ म्हणाले, ते अतिशय कपडे व्यवस्थित वापरत असत. नागपूरला जोधपुरी कोट, हिवाळी अधिवेशनाला जॅकेट आणि उन्हाळ्यात पांढरा झब्बा, रोज मेकअप, कपडे बदलून असायचे. केसांबाबत एक किस्सा सांगताना मुश्रीफ म्हणाले, "एका आमदाराने हेड ट्रान्सप्लांट (केशरोपण) केलं होतं, दादांनी त्याला विचारलं कुठं केलं? तो म्हणाला दुबईला. मी म्हटलं दादा तुम्ही का करत नाही? तर दादा म्हणाले, केस नसली तरी मी देखणा आहे का नाही? याचीच दृष्ट लागल्याचे सांगत मुश्रीफ यांना भावना अनावर झाल्या.
अपघाताची बातमी आणि बारामतीतील अनुभव
त्यांनी दादांच्या अपघातासंदर्भात बोलताना म्हणाले की, 28 तारखेला सकाळी एका मित्राचा फोन आला की दादांचा अपघात झाला. स्वप्नातही वाटलं नव्हतं की आमच्या नेत्याची अशी बातमी आम्हाला समजेल. आम्ही ताबडतोब बारामती गाठली आणि दोन दिवस बारामतीत आम्ही कधी झोपलो नाही. संपूर्ण महाराष्ट्र दोन दिवस टीव्ही समोर बसून होता, असे सांगताना मुश्रीफ यांना पुन्हा रडू कोसळले.
गट, पार्टी, पक्ष, जात काही बघायचं नाही
निवडणुका जिंकण्यासाठी कसं गोड बोलतो काय काय करतो, परंतु अजित दादा तसं नव्हतं. जे योग्य काम असेल ते चटकन होणार. अधिकाऱ्यावर प्रचंड वचक, प्रशासनावर प्रचंड वचक होता. जे पोटात असेल तेच तोंडावर, इतका रोखठोक आणि जे सत्य असेल तो बोलणारा आणि पूर्णपणानं आपल्या बारामती मतदारसंघात दीड लाखांवर निवडून येणारा असा व्यक्ती होता. काम जर योग्य असेल तर गट, पार्टी, पक्ष, जात काही बघायचं नाही, ते काम लवकर ताबडतोब कसं होईल यासाठी सातत्याने ते प्रयत्न करायचे.
इतर महत्वाच्या बातम्या
