कोल्हापूर : भाजप आणि राष्ट्रवादीत सुरु असलेलं शाब्दिक वॉर थांबायचं नाव घेत नाहीय. आता महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. 'चंद्रकांत दादा पाटलांना इतकी मस्ती कुठून आली' अशा शब्दात एकेरी भाषेत उल्लेख करत मुश्रीफांनी टीका केली आहे. मुश्रीफ म्हणाले की, मी फक्त मीडिया सेल प्रमुख नवीन कुमार जिंदालने केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपने माफी मागावी अशी मागणी केली होती.


चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवरुन बोलताना मुश्रीफ म्हणाले की, चंद्रकांत पाटलांची लायकी नाही, ते भित्रे आहेत. कोल्हापूरातुन पळून जावं लागलं. पुण्यात महिलेच्या जागेवर उभे राहावे लागते, यावरुन त्यांची लोकप्रियता कळते, असं त्यांनी म्हटलं. मुश्रीफ म्हणाले की, गेल्या मंत्रिमंडळात अपघातानेच त्यांना दोन नंबरचे स्थान मिळालं. कोल्हापुरातून पळून जावं लागलेल्या माणसानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रामाणिक व सोज्वळ व्यक्तीवर बोलणे योग्य नाही, असं ते म्हणाले. 


महाविकास आघाडी सरकार हे 25 वर्षे चालणार       
मुश्रीफ म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. राजकारण किती करायचं? याला काही मर्यादा आहे की नाही. देवेंद्र फडणवीस असो की चंद्रकांत पाटील असो, सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत.  सरकार अस्थिर करण्याचा कितीही प्रयत्न करू देत, काहीही आरोप करु देत, महाविकास आघाडी सरकार हे 25 वर्षे चालणार आहे, असं ते म्हणाले. 


लोककलावंतांना मदत करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार
मुश्रीफ म्हणाले की, कोरोना काळात लोककलावंत घटकावर फार मोठा परिणाम झालाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना या घटकांना मदत करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी देखील या घटकासाठी समोर येऊन मदत केली पाहिजे, असं ते म्हणाले.