जळगाव : उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रावर संकटाची मालिका सुरू झाली असल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही नारायण राणेंवर जोरदार हल्ला केला आहे. नारायण राणे केंद्रात मंत्री झाल्यापासून कोकणावर हे  संकट  कोसळले असून तेच पांढऱ्या पायाचे असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे
 
महाराष्ट्र संकटात असताना कोण कोणत्या पक्षाचा, याचा विचार न करता संकटात सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे माणूस म्हणून पाहण्याची आवश्यकता आहे. राजकारण करण्यासाथी वेगळे आखाडे आहेत. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा झेंडा घेऊन उतरा आम्ही आमचा झेंडा घेऊन उतरू. त्यावेळी जनता ज्याला आशीर्वाद देईल, तो आपण मान्य केला पाहिजे. मात्र अशा संकटाच्या वेळी कुणीही या गोष्टीचे राजकारण करू नये, असा सल्ला देखील गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना दिला आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार फंडातून अपंगांसाठी आज मोफत सायकल वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर काल गोळीबार झाल्याबद्दल बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं की या घटनेच्या संदर्भात पोलीस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यांनी हा गुन्हा केला आहे त्यांची नावे पोलिसांना माहित असल्याने पोलिस ही त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींना अटक झाल्यानंतर या घटनेचे खरे कारण काय ते समोर येईलच, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.