अकोला : कोरोनानं सैरभैर झालेल्या अकोल्यात पालकमंत्री बच्चू कडू यांनी 'लॉकडाउन'चा निर्णय जाहीर केला होता. 1 ते 6 जूनदरम्यान अकोला शहरात संपूर्ण 'लॉकडाऊन' करण्याचा निर्णय त्यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना जाहीर केला होता. मात्र, आपल्याच घोषणेनंतर सहा तासांत पालकमंत्री बच्चू कडूंनी चक्क 'यू-टर्न' घेतला. आता पालकमंत्री बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या परवानगीनंतर अकोल्याचे जिल्हाधिकारी लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करतील, असं जाहीर केलंय. त्यामुळे सरकारशी कोणतीही चर्चा न करता घोषित केलेल्या अकोल्यातील 'लॉकडाऊन'चा निर्णय पालकमंत्री बच्चू कडू यांनी घेतला होता.
स्थानिक स्तरावर स्वतंत्र आदेश काढता येणार नाही, असे राज्य सरकारने अगोदरच स्पष्ट केले आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांनी त्याकडे दुर्लक्ष करून थेट लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर आपल्या भूमिकेत घुमजाव करून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत. 1 ते 6 जूनपर्यंत जनता कर्फ्यू करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी आम्ही राज्य सरकारची परवानगी घेऊ. परवानगी आल्यानंतर जनता कर्फ्यूबाबत जिल्हाधिकारी घोषणा करतील, असं कडू यांनी म्हटलं आहे.
अकोला विदर्भातील कोरोनाचं सर्वात मोठं 'हॉटस्पॉट' झालं आहे. गुरूवारी रात्रीपर्यंत अकोल्यात कोरोनाचे 516 रूग्ण झालेत. तर 28 लोकांचा बळी कोरोनाच्या आजारानं घेतलाय. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळं अकोलेकर कोरोनाच्या भयानं सैरभैर झाले आहेत. सरकार आणि प्रशासनाच्या 'बैठक-बैठक' खेळात अकोला विदर्भातील कोरोनाचं सर्वात मोठं 'हॉटस्पॉट' ठरलं. एरव्ही अकोल्यात फक्त बैठकांपुरतेच मर्यादीत पालकमंत्री बच्चू कडू एकदम जागे झाले आहेत. गुरूवारच्या सर्वपक्षीय बैठकीत त्यांनी अकोल्यात 1 ते 6 जूनदरम्यान शहरात संपूर्ण 'लॉकडाउन'चा निर्णय जाहीर केला. दुपारी तीनच्या सुमारास पालकमंत्री बच्चू कडूंनी 'माझा'शी बोलतांना ही माहिती दिली होती.
पालकमंत्र्यांनी तेव्हा वेळ मारून नेण्यासाठी निर्णय तर घेतला खरा. मात्र, हे करतांना राज्य सरकार आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी त्यांनी यासंदर्भात चर्चाच केली नसावी. कदाचित त्यामुळेच त्यांना 'यू-टर्न' घ्यावा लागला असावा. अन् मग त्यांचं पुढचं वक्तव्य 'विचारू-पाहू-करू' या प्रकारातलं होतं.
विदर्भातील कोरोनाचं सर्वात मोठं 'हॉटस्पॉट' अकोला असणं हे येथील प्रशासनाचं अपयश आहे. त्याआधी ते पालकमंत्री म्हणून बच्चू कडू यांचंही तितकंच मोठं अपयश आहे.
मंत्री बच्चू कडूंची अकोला लॉकडाऊनची घोषणा, मात्र काही तासातच यू-टर्न
उमेश अलोने, एबीपी माझा
Updated at:
29 May 2020 08:51 AM (IST)
अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून अकोल्यात थेट लॉकडाऊनची घोषणा केली.
त्यानंतर आपल्या भूमिकेत घुमजाव करून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -