अर्जुन खोतकर कालच मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले होते. त्यानंतर आज अर्जुन खोतकर उद्धव ठाकरेंच्या भेटीला दाखल झाले. शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर अर्जुन खोतकरांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधात दंड थोपटले होते.
पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार मी लोकसभेची तयारी केली होती, आता तयारी अंतिम टप्प्यात आली आहे मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे, असं जाहीर करत जालना मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यावा, अशी मागणी खोतकरांनी केली होती.
जालनाच्या जागेवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय निर्णय होणार हे पाहावं लागणार आहे.
शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम असतो, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर येणार आहेत. यावेळी महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघा संदर्भात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत.