Kisana sabha on Milk Price : सध्या राज्यातील दुध (Milk)उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. कारण दुधाच्या दरात (Milk Price) सातत्यानं घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याविरोधात विविध शेतकरी संघटनांसह किसान सभा (Kisan sabha) आक्रमक होताना दिसत आहे. कारण सध्या दुधाला 25 रुपयांचा दर मिळत आहे. यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळं सरकारनं तातडीनं याची दखल घेऊन दुध उत्पादकांना दिलासा द्यावा, अन्यथा पुन्हा एकदा एल्गार करावा लागेल असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी (Dr. Ajit Nawale) दिलाय.
दुधाला किमान 34 रुपये दर अशी घोषणा दुग्ध विकासमंत्री विखे पाटलांनी केली होती
दुधाचे दर सातत्याने कोसळत असल्याने दुध उत्पादक शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. दुध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुधाला किमान 34 रुपये दर दिला जाईल अशी घोषणा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. प्रत्यक्षात मात्र आज दुधाला केवळ 25 रुपये दर मिळत असल्याचे अजित नवले म्हणाले. आंदोलनामुळं सुरु करण्यात आलेले दुध अनुदानही सरकारने बंद केले आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये यामुळं मोठा असंतोष खदखदत आहे. राज्य सरकारने या असंतोषाची तातडीने दखल घेऊन दुध उत्पादकांना दिलासा द्यावा अन्यथा पुन्हा आंदोलनाच्या मार्गाने जावे लागेल असा इशारा किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.
प्रतिलिटर किमान 10 रुपये अनुदान द्यावे
दुध उत्पादकांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदानाची घोषणा केली होती. मात्र, हे अनुदान केवळ 6 आठवडे म्हणजेच केवळ 2 महिने दिले गेले. दुधाला आज मिळणारा दर पहाता हे अनुदान पुन्हा सुरु करावे, दुध उत्पादकांचा वाढता तोटा व वाढता उत्पादनखर्च पाहता अनुदानामध्ये वाढ करून अनुदानाची रक्कम प्रतिलिटर किमान 10 रुपये करावी. तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 11 जानेवारी ते 10 मार्च या काळात केवळ अनुदान दिले गेले. पुढील चार महिने अनुदान बंद आहे. बंद काळातील अनुदानासह थकीत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने वर्ग करावे, अशी मागणी किसान सभा वआणि दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे.
पशुखाद्याच्या दरात वाढ, चाऱ्याची टंचाई
राज्यात पशुखाद्याचे दर सातत्याने वाढत आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याची राज्यात तीव्र टंचाई आहे. औषधोपचार व अनुषंगिक खर्च वाढल्याने दुधाचा उत्पादनखर्च सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे. राज्य सरकार व राज्याचे दुग्धविकास मंत्री मात्र अजूनही निवडणुकीच्या माहोलमधून बाहेर येताना दिसत नाहीत. अशा पार्श्वभूमीवर अखेर दुध उत्पादकांना तीव्र आंदोलना शिवाय पर्याय राहणार नाही असे अजित नवले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
दूध उत्पादकांसाठी सुप्रिया सुळे मैदानात, 7 दिवसात दर वाढवा अन्यथा..सुळेंचा सरकारला इशारा