दूध 10 ते 15 रुपयांनी स्वस्त मिळणार?
एबीपी माझा वेब टीम | 06 Aug 2016 09:56 AM (IST)
ठाणे : मुंबई-पुण्यासह राज्यभरातील ग्राहकांना यापुढे सरकार स्वस्त दराने गाय आणि म्हशीचं दूध उपलब्ध करुन देणार आहे. शेतमालाप्रमाणे दूधही थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार पणनमंत्री राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे. गाईचं दूध ३२ ते ३५ रुपये लिटरने तर म्हशीचं दूध ४५ रु लिटर दराने शहरवासियांना देण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांनाही जादा दर मिळेल तर ग्राहकांना गाईचं दूध १५ रुपयांनी स्वस्त मिळेल, असा दावा पणनमंत्री राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. ते ठाण्यात बोलत होते. काही संस्थांनी स्वस्त दूध विक्री योजनेसाठी पुढाकार घेतल्याचंही सदाभाऊ खोत म्हणाले. अशा स्वस्त दूध योजनेसाठी पुढाकार घेणाऱ्या संस्थांना पणन विभाग पूर्ण सहकार्य करेल असंही त्यांनी नमूद केलं. सध्या मुंबईत गाईचं दूध सुमारे 45 रुपये लिटर आहे, तर म्हशीच्या दुधाचा दर 60 रुपयापर्यंत आहे.