मुंबई : दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दूध उत्पादक महिला शेतकऱ्यांना घेऊन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवली आहेत. सांगलीच्या आटपाडी येथील बाळेवाडी मध्ये एका जनावराच्या गोठ्यातून पत्रे लिहून दुधाला प्रती लिटर 10 रुपये अनुदान देण्यासह विविध मागण्या पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी देवो,असे साकडे गायीला घालण्यात आले.


महायुतीकडून दूध दरवाढीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन छेडण्यात आले आहे . 13 ऑगस्टपासून तिसऱ्या टप्प्यातील या आंदोलनात दुध दरवाढीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातून पत्राद्वारे मागणीचे आंदोलन करण्यात येत आहे. 19 ऑगस्टपर्यंत पत्रे पाठवण्याचे आवाहन महायुतीकडून राज्यातील शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. पाच लाख पत्रे या आंदोलनच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे. आज भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आटपाडीच्या बाळेवाडी याठिकाणी हे आंदोलन करण्यात आले आहे.


यावेळी दूध उत्पादक शेतकरी महिलांनी गायीला औक्षण करत दुधाला दर देण्याच्या मागणीचे पत्रे लिहीत होते. तसेच ती पत्रे गायीच्या गळ्यात बांधून गाईसमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुबुद्धी देवो, असे साकडे घालत ही पत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आली आहेत. तर यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोलताना दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान थेट खात्यात द्यावे, दूध भुकटीला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावे, गायीचे दुध प्रति लिटर 30 रुपये प्रमाणे खरेदी करण्यात यावे, अशी मागणी सरकारकडे करण्यात येत आहे. मात्र सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करत, तातडीने शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष द्यावे,अन्यथा महायुती राज्यातील शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरले आणि याला जबाबदार सरकार असेल ,असा इशारा आमदार पडळकर यांनी यावेळी दिला आहे .


सोलापुरात गायी रस्त्यावर आणत दुधाला अनदान देण्याची मागणी; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक