Maharashtra political crisis : शिवसेनेविरोधात बंड करून ठाकरे सरकारच्या सत्तेला सुरूंग लावणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने आता थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची कोर्टात बाजू मांडण्यासाठी नामांकित वकील हरीश साळवे मैदानात उतरले आहेत. तर महाविकास आघाडीच्या बाजूने जेष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी असणार आहेत.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात गेला आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील कोर्टात दाखल करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. उद्या या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या या सुनावणीकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
एकनाथ शिंदे गटाला बजावण्यात आलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना शिंदे गटाने हायकोर्टात आव्हान दिले आहे. याबरोबरच अजय चौधरी यांच्या नियुक्तीला देखील शिंदे गटाने याचिकेद्वारे आव्हान देले आहे. शिवाय शिंदे गटाच्या आमदारांना पोलीस संरक्षण देण्याचीही याचिकेत मागणी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटातील दोन सदस्यांची याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेमार्फत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या बाजूनं कौल दिल्यामुळे त्यांच्या निर्णयाविरोधात थेट आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले या दोघांकडून दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या