mhada new housing project म्हाडा प्रशासन आतापर्यंत उभारण्यात आलेल्या सर्व गृह प्रकल्पांपेक्षा सर्वात मोठा गृह प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. हा गृहप्रकल्प कळवा येथील मफतलाल कंपनीच्या जागेवर उभारण्यात येईल आणि या ग्रुप प्रकल्पात तब्बल 29 हजार घरं उभारण्यात येणार आहेत अशी माहिती आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. या प्रकल्पासाठी जी मतलाल कंपनीची जमीन गरजेचे आहे, ती सध्या कायद्याच्या कचाट्यात असून थेट कोर्टाकडे यासंदर्भात प्रस्ताव ठेवणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. हा प्रकल्प अस्तित्वात आल्यास ज्या ठिकाणी एक कोटींच्या घरात वन बीएचके घरांची किंमत आहे त्याच ठिकाणी जास्तीत जास्त 30 लाखांपर्यंत घरे उपलब्ध होणार आहेत.

Continues below advertisement


या प्रकल्पा संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती देण्यात आली असून त्यांची मंजुरी मिळाली आहे अशी माहिती आव्हाड यांनी दिली आहे. कळवा पूर्वेला असलेल्या मफतलाल कंपनीच्या जमिनी संदर्भातला वाद सध्या कोर्टामध्ये प्रलंबित आहे. अनेक कामगारांची देणी थकल्याने तसेच काही बँकांचे कर्ज परत फेड न केल्याने त्यांनी दाखल केलेल्या केसेस सध्या सुरू आहेत. यातून मार्ग कसा काढणार असे विचारले असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, "कळव्यात मफतलाल कंपनीची जमिन आहे, आमचा प्रयत्न आहे की कोर्टाद्वारे ती पूर्ण जमीन म्हाडा विकत घेईल, जर तो प्रस्ताव व्यवस्थित कोर्टाने मान्य केला तर महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा गृह प्रकल्प तो असेल, जिथे 29 हजार घरे आम्ही निर्माण करू. 


आव्हाडांचा फॉर्म्युला 


कोर्टाने 3 हिस्से करावे, सरकारला देण्यात येणारा हिस्सा आम्ही बघून घेऊ, कामगारांचे 200 ते 250 कोटी थकीत पैसे आम्ही एकाच वेळी कोर्टात सर्व देण्यास तयार आहोत. तर बँकर्स सोबत आम्ही बोलणी करून एकाच वेळी सगळी देणी देऊ आणि तो प्रश्नदेखील बाजूला सारू. आमच्याकडे निधी तयार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या घरांमध्ये एचआयजी, एमआयजी, एलआयजी अशी सर्व प्रकारची घरे असतील.