MHADA Konkan Division Houses Lottery Updates: म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या  (MHADA Konkan Division Houses Lottery) वतीनं ठाणे शहर आणि ठाणे जिल्हा, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या पाच 311 सदनिकांसाठी लॉटरी जाहीर केलेली. म्हाडाच्या या सोडतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच म्हाडाकडून अर्जविक्री- स्वीकृतीला एका महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतवाढीनुसार, आता सोडतीसाठी 18 नोव्हेंबरपर्यंत अनामत रकमेसह अर्ज दाखल करता येणार आहे. तसेच, 13 डिसेंबरला सोडत काढली जाणार आहे. 


म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5 हजार 311 घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री-स्वीकृतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. सोडतीत समाविष्ट होणाऱ्या अर्जांची संख्या दहा हजारांचा टप्पाही ओलांडण्याची शक्यता नसल्यानं कोकण मंडळाकडून अर्जविक्री- स्वीकृतीला एका महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार आता इच्छुकांना 18 नोव्हेंबरपर्यंत आरटीजीएस एनईएफटीद्वारे अनामत रकमेसह अर्ज दाखल करता येणार आहे. परिणामी 7 नोव्हेंबरची सोडत रद्द करण्यात आली असून आता 13 डिसेंबरला सोडत काढण्यात येणार आहे.


कोकण मंडळाच्या मे महिन्याच्या सोडतीतील शिल्लक आणि इतर उपलब्ध घरांसाठी सप्टेंबरमध्ये सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर, 15 सप्टेंबरपासून अर्जविक्री-स्वीकृती सुरू करण्यात आली आहे. आरटीजीएस, एनईएफटीसह अनामत रक्कम भरत अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 18 ऑक्टोबरला ही मुदत संपणार आहे. मात्र, अनामत रकमेसह दाखल झालेल्या अर्जांची संख्या 10 हजारांचा पार जाण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे कोकण मंडळाने अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव कोकण मंडळानं म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता. शुक्रवारी या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.


घरं विकण्यासाठी म्हाडाची कसरत


पंतप्रधान आवास योजनेतील आणि विरार-बोळिंज येथील मंडळाच्या घरांची विक्री होत नसल्यानं म्हाडा प्राधिकरणाची चिंता वाढली आहे. तर, आर्थिक अडचणीही निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आता मंडळ सोडतीच्या मुदतवाढीच्या कालावधीत घरं विकण्यासाठी विविध योजना आखणार आहे. सोडतीविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तर, विविध माध्यमातून सोडतीची प्रसिद्धी करण्यात येणार असल्याची माहिती मंडळातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यानं दिली. 


अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन 


नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून सहजरित्या उपलब्ध होणार आहेत. सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय प्रणाली अर्जदार अँड्रॉइड (Android) अथवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर उपलब्ध आहे.  ॲन्ड्रॉईड व्हर्जनच्या मोबाईलमध्ये गूगल ड्राईव्हच्या प्ले स्टोअर आणि आयओएस व्हर्जन ॲप स्टोअरमध्ये  Mhada Housing Lottery System या नावे मोबाईल ॲप उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, एव्ही आणि हेल्प फाईल या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका नीट वाचावी, असं आवाहन कोंकण मंडळाच्या वतीनं करण्यात आली आहे.