मुंबई : उपनगरीय रेल्वे आणि मेट्रोच्या डब्यांच्या निर्मितीचा प्रकल्प आता लातूरमध्ये उभारण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीत ही माहिती दिली.


या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी गोयल यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे मराठवाड्यातील आर्थिक–औद्योगिक विकासाला चालना मिळेल, आणि मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील–निलंगेकर यांचंही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं. सह्याद्री या राज्य अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली.

मुंबईत आणखी काही टप्प्यांमध्ये मेट्रो धावणार आहे. तर पुणे, नागपूरमध्येही मेट्रोचं आगमन होणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या डब्यांची निर्मिती लातूरमध्ये होईल.