Kokan Railway Megablock : कोकण रेल्वे मार्गावर 11 आणि 12 जुलैला मेगाब्लॉक (Kokan Railway Megablock) घेण्यात येणार आहे, एकूण सहा गाड्यांवर याचा परिणाम होणार आहे. देखभालीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. संगमेश्वर ते भोके दरम्यान 11 जुलैला, तर कुडाळ ते वेर्णा दरम्यानच्या देखभालीच्या कामांसाठी 12 जुलैला मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर 11 आणि 12 जुलैला मेगाब्लॉक
संगमेश्वर ते भोके दरम्यान 11 जुलैला सकाळी 7.30 ते 10.30 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे आणि या तीन तासांच्या मेगाब्लॉकमुळे तिरुनेलवेली-जामनगर (11577) ही 10 जुलै रोजी प्रवास सुरू करणारी एक्स्प्रेस गाडी ठोकुर ते रत्नागिरी दरम्यान 2 तास 30 मिनिटं थांबवून ठेवली जाणार आहे. तर 10 जुलै रोजी प्रवास सुरू होणारी तिरुअनंतरपुरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एकस्प्रेस (16346) कर्नाटकातील ठोकुर ते रत्नागिरी दरम्यान 1 तास थांबवून ठेवली जाणार आहे.
सहा गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम
कुडाळ ते वेर्णा दरम्यान 12 जुलैला सायंकाळी 3 ते 6 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे आणि या तीन तासांच्या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या चार गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मुंबई सीएसएमटी-मडगाव (12051) ही 12 जुलै रोजी प्रवास सुरु होणारी जनशताब्दी एक्स्प्रेस गोव्यातील थिवीम स्थानकावर तीन तास थांबवली जाणार आहे. हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम (12618) ही 11 जुलैला प्रवास सुरू होणारी मंगला एक्स्प्रेस रोहा ते कुडाळ दरम्यान अडीच तास रोखून ठेवली जाणार आहे. याचबरोबर दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस (10105) ही 12 जुलै रोजी सुटणारी गाडी रोहा ते कणकवली दरम्यान 50 मिनिटं थांबवली जाणार आहे, तर तिरुअनंतरपुरम सेंट्रल-हजरत निजामुद्दीन (22653) ही गाडी ठोकुर ते वेर्णा दरम्यान 2 तास 50 मिनिटं रोखून ठेवली जाणार आहे.
वंदे भारतसह इतर रेल्वे तिकीटांत 25 टक्क्यांपर्यंत कपात
रेल्वे मंत्रालयाने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक गोड बातमीही दिली आहे. वंदे भारतसह (Vande Bharat) सर्व गाड्यांचे एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास आणि विस्टाडोम कोचचं भाडं 25 टक्क्यांपर्यंत कमी केलं जाणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. ट्रेनमध्ये जास्तीत जास्त जागांचं आरक्षण व्हावं, यासाठी भाड्यात कपात केली जाणार असल्याचं रेल्वेनं सांगितलं. रेल्वेचं भाडं आता स्पर्धात्मक पद्धतीने ठरवण्यात येणार आहे.