मुंबई : राज्य सेवा आयोगाकडून शासनाच्या विविध विभागाअंतर्गत एकूण 342 पदांच्या भरतीकरता आज जाहिरात प्रसिद्ध केली असून, यामध्ये महसूल विभागातील 230 पदांची मेगा भरती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, राज्यात मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात 16 टक्के आरक्षणाचा कायदा लागू झाल्यानंतर यापैकी काही पदे मराठा समाजासाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

शासनाच्या विविध विभागाअंतर्गत एकूण 342 पदांच्या भरतीकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज जाहिरात प्रसिद्ध केली असून, या रिक्त पदांच्या भरतीकरिता राज्यातील एकूण 37 जिल्हा केंद्रांवर यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेतील सर्वाधिक म्हणजे 230 पदे ही महसूल विभागातील आहेत. यामध्ये उप जिल्हाधिकारी (गट-अ) साठी 40 , तहसिलदार (गट-अ) 77, नायब तहसिलदार (गट-ब) 113 असे एकूण 230 पदांसाठी ही मेगा भरती होणार आहे.

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 16 टक्के आरक्षण देणारे विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले. यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर याचा कायदा सर्वत्र लागू झाला असून, आज प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये मराठा समाजासाठीदेखील काही जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या पदांसाठी इच्छुकांना 31 डिसेंबर 2018 पर्यंत http://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज करता येणार आहेत. इच्छुकांना अर्ज करताना माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर असलेल्या नावाप्रमाणेच नोंदणी करणे व आयोगास अर्ज सादर करणे बंधनकारक आहेत.