शिर्डी : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजात नाराजी निर्माण झाली आहे. आरक्षण लढा उभारण्यासाठी भाजप नेते राधाकृष्ण विखे यांच्या लोणी गावात राज्यातील मराठा समाजातील संघटना पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत राज्यव्यापी लढा उभारण्या बरोबरच पक्ष विरहित एकत्र येऊन लढा उभारण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्यानंतर अनेक मराठा संघटनासह राजकीय नेत्यांनी आरक्षण लढा उभारणायचा इशारा दिलाय. गेल्या काही दिवसांपासून खासदार छत्रपती संभाजीराजे राज्यातील महत्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत असून दुसरीकडे भाजपनेही राज्यभर मराठा भाजप नेत्यांचे दौरे आयोजित केले आहेत. काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे यांनी पक्ष विरहित सर्व संघटनांनी एकत्र येऊन लढा देण्याचं आवाहन केलं होतं.. या आवाहनाला प्रतिसाद देत आज अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात राज्यातील मराठा समाजातील संघटना पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस लातूर, जळगाव , तुळजापूर, बीड, धुळे, हिंगोली , भुसावळ सह राज्यातील अनेक जिल्ह्यातील मराठा संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सामूहिक नेतृत्वाने पुढे गेले पाहिजे. हे मी सुरुवातीलाच जाहीर केले होते. कुणी एकट्याने नेतृत्व करावे, अशी भूमिका आता राहिलेली नाही. मधल्या काही प्रकाराने यात विसंगती दिसते आहे. एक तर सरकारचा नाकर्तेपणा त्यात मराठा समाजाला मिळालेले आरक्षण गेले याची अस्वस्थता मराठा समाज आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. या सरकारमधील मंत्री आता मोर्चे काढायला लागले. त्यामुळे सरकारबद्दल विश्वासहर्ता समाजामध्ये राहिलेली नाही. लोणीत झालेल्या बैठकीत काही मुद्दे केंद्र सरकारशी संबंधित आहे, असे मानले गेले. म्हणून पहिल्या टप्प्यात पुढील दहा दिवसांमध्ये मराठा समाजाचे सर्व आमदार, खासदारांची बैठक मुंबईला बोलवणार आहे. मराठा समाजाच्या सर्व संघटनांना यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यानी दिली.
एकीकडे राज्य सरकारने मराठा समाजाला EWS आरक्षण जाहीर केले आहे आणि दुसरीकडे आता पक्षविरहित आंदोलन उभे राहण्याची चिन्हे निर्माण झाली असून सर्वच संघटना एकाच व्यासपीठावर एकत्र आल्यास पुन्हा एकदा सरकार विरुद्ध मराठा समाज असा वाद वाढणार हे मात्र नक्की आहे.