Maharashtra Corona Outbreak : देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोर्डवर आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) यांनी तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र (Maharashtra) या राज्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून योग्य त्या उपाययोजना करण्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. त्यांनी महाराष्ट्रातील वाढत्या कोविड-19 रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर अवघ्या काही तासांतच सार्वजनिक आरोग्य अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास (Dr. Pradeep Vyas) यांचं पत्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांना लक्ष ठेवण्याच्या आणि योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना या पत्रातून देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या (Maharashtra Covid Update) संख्येत वाढ होत असतानाच सार्वजनिक आरोग्य अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी नागरी आणि जिल्हा प्रशासनाला रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी काही उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचं आवाहनही या पत्रातून करण्यात आलं आहे. तसेच, गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं घट होत असताना आता पुन्हा एकदा नवीन रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णांची संख्या हजार पार पोहोचली आहे. त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं असल्याचंही डॉ. व्यास यांनी नमूद केलं आहे.
पत्रात त्यांनी नमूद केलंय की, "रेल्वे, बस, सिनेमा, सभागृह, कार्यालयं, रुग्णालयं, महाविद्यालयं, शाळा यासारख्या बंद सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं आवश्यक आहे." तसेच, या पत्रातून त्यांनी जिल्हा प्रशासनाचे कानही टोचले आहेत. ते म्हणाले की, वारंवार सूचना देऊनही कोरोना चाचण्यांचं प्रमाण कमी झालं आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये तात्काळ ते वाढवणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे त्वरित कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवण्याच्या सूचना त्यांनी या पत्रातून दिल्या आहेत.
"वारंवार सूचना देऊनही, राज्यात कोरोना चाचणीमध्ये लक्षणीय घट झाली आहे. 1 जूनपर्यंत, 26 जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणाऱ्या साप्ताहिक चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. हे चिंतेचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये तात्काळ कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात यावी.", असं डॉ. व्यास म्हणाले. तसेच, व्यास यांनी अधिकार्यांना वेळ, ठिकाण आणि व्यक्ती यांसंदर्भात वेळोवेळी नवीन रुग्णांचे विश्लेषण करण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन स्थानिक कृती आराखडा तयार करता येईल.
डॉ. व्यास म्हणाले की, "सध्या मुंबई आणि ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. पॉझिटिव्हिटी दर वाढल्यामुळे राज्यातील इतरही जिल्ह्यांमधील रुग्णांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. गेल्या काही दिवसांची आकडेवारी पाहता, मागील आठवड्याच्या तुलनेत नऊ जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे."
गेल्या आठवड्याच्या तुलनेत नऊ जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. हे पाहता कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही पावलं उचलण्याची गरज आहे. डॉ. व्यास म्हणाले की, राज्य हातावर हात ठेवून बसू शकत नाही, सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. तुम्हाला माहिती असेलच की, महाराष्ट्रात अलीकडे BA.4 आणि BA.5 व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या रुग्णांमध्ये फारशी गंभीर लक्षणं आढळलेली नसली तरी आपण वेळीच सावध होणं गरजेचं आहे, असंही डॉ. व्यास म्हणालेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :